वृत्तसंस्था/ मीरपूर
फलंदाजीवर ठामपणे लक्ष केंद्रीत करून भारतीय महिला क्रिकेट संघ आज गुऊवारी येथे होणाऱ्या अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून बांगलादेशचा 3-0 असा धुव्वा उडवण्याचे ध्येय बाळगून असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिले दोन सामने जिंकले असून तिसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताना मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याचा त्यांचा विचार असेल.
तथापि, दुसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी अपेक्षेनुरुप झालेली नाही. त्यात त्यांना निर्धारित 20 षटकांत 95 धावाच काढता आल्या आणि काही भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे यजमानांचा डाव 87 धावांत आटोपून त्यांना सात धावांनी विजय नोंदविता आला. त्याचप्रमाणे तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांना अजेय आघाडी मिळाली. या मालिकेत दोनदा अपयशी ठरल्याने सलामीवीर शेफाली वर्माने पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष वेधून गेलेली असेल. तिची 14 चेंडूंत 19 धावांची खेळी संघाच्या पडझडीत सर्वोच्च धावसंख्या ठरलेली असली, तरी या युवा फलंदाजाला तिची क्षमता आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्ष यांची चांगलीच जाणीव असेल. 16 जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी फॉर्मात येण्याची तिला ही आणखी एक संधी आहे.
मंगळवारी 13 चेंडूंत 13 धावा काढून बाद झाल्यानंतर उपकर्णधार स्मृती मानधना देखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. भारतीय सलामीवीर आतापर्यंत या मालिकेत एकत्र चमकण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्सच्या बाबतीतही असेच घडले असून तिने 8 धावांसाठी तब्बल 21 चेंडू घेतले आणि मध्यफळीत तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात विजयी खेळी केल्यानंतर दोन दिवसांनी पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झालेल्या कर्णधार हरमनप्रीतला हे अपयश फारसे मनाला लागणार नाही.
दुसऱ्या सामन्यात 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाला दीप्ती शर्मा, मिन्नू मणी आणि शेफाली यांनी 20 षटकांत गुंडाळल्याने भारताला सलग दुसरा विजय नोंदविता आला. बांगलादेशतर्फे कर्णधार निगार सुलताना (55 चेंडूंत 38) तेवढी एकट्याने खेळली. शेवटच्या सामन्यात दिलासादायक विजय मिळविण्याच्या दृष्टीने यजमान संघाला फलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगल्या प्रकारे रोखून दाखविलेले असले, तरी भारताची अष्टपैलू ताकद पाहता विजय मिळविण्याचे आव्हान त्यांना बरेच जड जाईल असे वाटते.
संघ : भारत-हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री, अमनज्योत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरे•ाr, मिन्नू मणी.
बांगलादेश : निगार सुलताना (कर्णधार), शमिमा सुलताना, मुर्शिदा खातून, शोभना मोस्तारी, शोरना अख्तर, रितू मोनी, नाहिदा अख्तर, फहिमा खातून, राबेया खान, शांजिदा अख्तर, सलमा खातून, माऊफा अख्तर, दिलारा अख्तर, दिशा बिस्वास, सुलताना खातून, शाठी राणी.









