सांगली :
माझ्यासमोर आव्हान निर्माण होत नाही तोपर्यंत मी शांत असतो. आता मला आव्हान निर्माण केले आहे. रेझीस्टन्स तयार होतो त्यावेळी माझ्यातील ओरिजिनल माणूस तयार होतो. आता पुढे काय होते ते थोडे दिवस बघा, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना नाव न घेता दिला. ते सांगलीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
आमदार जयंत पाटील यांनी येथील आयर्विन पुलाला समांतर पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि आघाडीतील इतर नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असते ते म्हणाले, पक्षातून जाणारे जातील आणि थांबणारे माझ्यासोबत थांबतील. मात्र थोडे दिवस बघा काय होतंय ते असे सुचक विधानही जयंत पाटील यांनी केले.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुरु असणाऱ्या आरोप प्रत्यरोपावरुन थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, कोकाटे असो किंवा अन्य मंत्री. त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी कुणी काही केलं तरी त्यांना राजीनामा देवू द्यावयाचा नाही, हे सरकारचे धोरण आहे. वादग्रस्त मंत्र्याचे कृत्य राज्याच्या प्रमुखांना मान्य आहे असा याचा अर्थ होतो, अशी टिकाही केली.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या सांगली पेठ आणि राज्यातील अन्य रस्ते कामाच्या टेंडर प्रक्रियेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे यांचे कौतुक आहे. हा रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटीकडे कर्व्हट झाला. यासाठी गडकरींना अनेकवेळा भेटलो. त्यांनी मान्यता देवून काम पूर्ण केले. रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला आहे. केंद्र सरकारची टेंडर कामे ४६ टक्के कमी दराने केली जातात. तरीसुद्धा ती चांगल्या दर्जाची आहेत. मात्र राज्य सरकारची टेंडर कामे ४० टक्के जादा दराने केली जातात. त्याची गुणवत्ता मात्र बिकट आहे, असे ते म्हणाले.
- मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता संपली
उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेनी राजीनामा घेतला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणायचे, हे सब झुठ आहे. मुख्यमंत्री मालक आहेत. त्यांनी सर्व गोष्टींची मान्यता दिल्याने हे सर्व काम करतात. सरकार जनतेसमोर कसं दिसले पाहिजे, याचा फार बारकाईने विचार करायला हवा. मंत्र्यांची कृती मान्य असेल तर मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता संपलेली दिसते अशी टीका आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.








