वृत्तसंस्था/ हैदराबाद
एकामागून एक पराभवाचे धक्के बसलेल्या सनरायजर्स हैदराबादला आज रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्सचा सामना करताना विशेषत: त्यांच्या फलंदाजीतील कमतरता दूर करण्यावर भर द्यावा लागणार आहे. मागील दोन्ही स्पर्धांत आठव्या स्थानावर राहिलेला हा संघ या हंगामात चांगली सुऊवात करेल अशी आशा होती. परंतु त्यांना अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून दोन पराभव स्वीकारावे लागलेले आहेत.
काही उत्तम खेळाडू असूनही फलंदाजीतील खराब प्रदर्शन हे सनरायजर्सच्या अपयशाचे प्रमुख कारण राहिले आहे. चांगल्या भागीदारी करण्यात आलेल्या अपयशामुळे त्यांना आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये 131 आणि 121 इतक्याच धावा काढता आलेल्या आहेत. एकापाठोपाठ एक फलंदाज गमावल्याने त्यांच्या डावाला गतीच मिळू शकली नाही. पहिल्या सामन्यात ‘पॉवरप्ले’मध्ये सनरायजर्सची स्थिती 2 बाद 30 धावा अशी झाली, तर लखनौविरुद्ध त्यांनी 1 बाद 43 धावा काढल्या होत्या खऱ्या, पण ही अनुकूलता त्यांनी पुढे गमावली आणि त्यामुळे नऊ षटकांत 4 बाद 55 अशी त्यांची अवस्था झाली.
नवीन कर्णधार एडन मार्करमच्या पुनरागमनाने त्यांचे नशीब बदललेले नाही. उलट त्याला खातेही उघडता आले नाही. हॅरी ब्रूककडे फिरकी खेळण्याची चांगली क्षमता असली, तरी दोन्ही सामन्यांत त्याला फिरकीपटूंनीच बाद केले. मागील सामन्यात त्यांनी अभिषेक शर्माऐवजी यष्टरीक्षक अनमोलप्रीत सिंगला सलामीला पाठविले आणि तो आश्वासक दिसला असला, तरी मयंक अग्रवाल व राहुल त्रिपाठी यांनी कामगिरीत सातत्य दाखविता आलेले नाही. दोन्ही सामन्यांमध्ये अब्दुल समदच्या योगदानामुळे त्यांना समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचता आले. त्यांच्याकडे हेन्रिक क्लासेनसारखा फटकेबाज असल्यामुळे ते कशी संघरचना करतात ते पाहावे लागणार आहे.
सनरायजर्सकडील अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी सर्वांत सातत्यपूर्ण राहिला, तरी त्यांच्या गोलंदाजांना बचाव करण्यासाठी पुरेशी धावसंख्याच लाभलेली नाही. याबाबतीत त्यांना लवकरात लवकर सुधारणा घडवावी लागेल. दुसरीकडे, पंजाब किंग्सला दोन विजयांमुळे जोर चढलेला असून मोहाली येथे त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी, तर राजस्थान रॉयल्सला गुवाहाटीमध्ये पाच धावांनी पराभूत केले. अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वाखालील या संघाने त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ही मजल मारलेली असून दोन्ही सामन्यांत त्यांनी 190 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली. धवनने स्वत: दोन अर्धशतके झळकावलेली अहेत तसेच प्रभसिमरन सिंग आणि बी. राजपक्षे यांनी गरज असताना मदत केलेली आहे. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याच्या बाबतीत त्यांच्या अर्शदीप सिंगने चांगले योगदान दिलेले आहे. विदेशी खेळाडूंमध्ये नॅथन एलिसने राजस्थानविरुद्ध प्रभावी कामगिरी केली, तर अष्टपैलू सॅम करनची गोलंदाजी महाग ठरलेली आहे.









