पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि जी-20 नव्या जागतिक व्यवस्थेसाठी प्रोत्साहकाची भूमिका पार पाडणार आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीत येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 ची शिखर परिषद होणार आहे. त्यानिमित्त, त्यांनी एका प्रसिद्ध आर्थिक नियतकालिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत या परिषदेसंबंधी आणि भारताच्या सहभागाविषयी आपले विचार शनिवारी मांडले.
सध्याच्या जी-20 परिषदेत आज दक्षिण गोलार्धाचा ध्वनी उमटत आहे. पूर्वी दुर्लक्षित असणाऱ्या या भूभागाकडे आज जागतिक संस्था लक्ष ठेवून आहेत. तसेच ही जी-20 परिषद महिलांचीही क्षमता लक्षात घेत असून त्यांच्या नेतृत्वातील विकासाला प्रोत्साहन देत आहे. भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञान आपल्या सर्वांच्या जीवनात मोठी भूमिका साकारणार आहे. जी-20 परिषदेनेही काळाची ही पावले ओळखली असून कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचा निर्धार तिने केला आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
भारताला मोठी संधी
परिवर्तन होत असलेल्या जागतिक व्यवस्थेत भारतालाही मोठी संधी प्राप्त होत आहे. भारताच्या आणि जागतिक चिंतांचे समाधान करण्यासाठी भारताचे योगदानही महत्वाचे ठरणार आहे. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा झपाट्याने उपयोग होत आहे. जगही या प्रगतीकडे आश्चर्याने आणि कौतुकाने पहात आहे. भारताला जगाच्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उप्तादनांचे केंद्र बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठाच हातभार लागणार आहे. केंद्र सरकार या संधीचा लाभ उठविण्यासाठी उत्सुक आहे. भारताला यावर्षी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली. भारताच्या नेतृत्वातील जी-20 परिषद ‘एक जग, एक कुटुंब’ या संकल्पनेला पुढे नेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना केले.
जगाचे भवितव्य एकात्म
या पुढच्या काळात जगातील सर्व देशांचा प्रवास एकाच दिशेने होणार आहे. साऱ्या जगाचे भविष्य आणि भवितव्य समान राहणार आहे. पर्यावरण संरक्षण हे साऱ्यांचे ध्येय असणे आवश्यक आहे. हरित तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यांचा विचार आज सारे जग एकाच वेळी करु लागले आहे. ही काळाची मागणी आहे. सर्वांना ती खुणावत आहे, असेही विचार त्यांनी व्यक्त केले.
भारताच्या सामर्थ्याचा परिचय
ज्या प्रकारे भारताने कोरोनाचा उद्रेक हाताळला, तसेच इतर देशांनाही साहाय्य केले, ज्या झपाट्याने लसीकरण कार्यक्रम हाती घेतला, याच संकटाच्या काळात ज्या प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग जगात सर्वाधिक राखला, तसेच ज्या धोरणांमुळे आम्ही आमच्या बँकांची आणि वित्तसंस्थांची स्थिती सुधारुन त्यांना प्रगती आणि वाढीच्या मार्गावर नेले, त्यामुळे भारताच्या सक्षमतेचा परिचय जगाला होत आहे. जग आज भारताकडे आशावादी दृष्टीकोनातून पहात असून ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असेही त्यांनी आवर्जून अधोरेखित केले.
केवळ बोलून भागणार नाही
केवळ पैशाच्या भाषेत सर्व समस्या सुटत नाहीत. केवळ अब्ज, सहस्रअब्जाची आकडेवारी देऊन परिणाम साधता येत नाही, ही बाब आता जी-20 परिषदेच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे प्रगत देश आणि प्रगतीशील देश आता एकमेकांना सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रथमच त्यांच्यामधील अंतर कमी होताना दिसत आहे. भारताच्या अध्यक्षतेच्या काळात जी-20 मध्ये विविध घटकांचा सहभाग अभूतपूर्व होता. एकंदर, या काळात जी-20 परिषदेने नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्यासाठी स्वत:ला सज्ज केले आहे. आज आर्थिक विकासाला जोडून पर्यावरणाचाही विचार केला जात आहे, ही आश्वासक बाब आहे, असे अनेक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले









