दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे. 2018 मध्ये हुसैन यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. याच आरोपांवरून हा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी 3 महिन्यांत तपास पूर्ण करून त्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयाला सोपवावा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर शाहनवाज यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सुनावणीदरम्यान न्यायाधीश आशा मेनन यांनी दिल्ली पोलिसांना फटकारले आहे. दिल्ली पोलिसांची भूमिका वेळकाढूपणाची राहिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत शाहनवाज यांनी जलद सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याला नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी पुढील आठवडय़ात विचार करू शकते. दिल्लीत राहणाऱया महिलेने जानेवारी 2018 मध्ये कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करत शाहनवाज यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. छतरपूर येथील फार्म हाउसमध्ये शाहनवाज यांनी आपल्यावर बलात्कार केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने म्हटले होते. भादंविचे कलम 156 (3) अंतर्गत दिल्ली पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचा निर्देश देण्याची मागणी पीडितेने केली होती.









