वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय स्तरावरील एका नेमबाजाने कर्नी सिंग रेंजमध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेत 10 मीटर एअर पिस्तूल सिलिंडरचा स्फोट झाल्याने डाव्या हाताचा अंगठा गमावला असून ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. भारतीय हवाई दलाचा पुष्पेंदर कुमार हा सध्या भोपाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शूटिंग रेंजवर प्रशिक्षण घेत होता. यावेळी ही घटना घडून त्यात अंगठा गमवावा लागण्याबरोबर त्याला गंभीर जखम झाली आणि त्वरित ऊग्णालयात दाखल करावे लागले.
सध्या त्याला येथील भारतीय लष्कराच्या ‘आर अँड आर’ ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका राष्ट्रीय प्रशिक्षकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, पुष्पेंदर मुख्य सिलिंडरमधून पिस्तूल सिलिंडरमध्ये ‘काप्रेस्ड एअर’ भरत असताना ही घटना घडली. एअर पिस्तूल आणि एअर रायफलमध्ये बॅरलच्या अगदी खाली एक ‘स्लीक गॅस सिलिंडर’ जोडलेला असतो. जेव्हा नेमबाज ट्रिगर दाबतो, तेव्हा सिलिंडरमधील ‘कॉप्रेस्ड एअर’ सोडली जाऊन ती एअर गनच्या आंत जोर लावते आणि ‘लीड पेलेट’ बाहेर फेकली जाते. एअर पिस्तूलचा सिलिंडर ‘कॉप्रेसर’ किंवा पोर्टेबल सिलिंडरच्या मदतीने ठरावीक फेऱ्यांनतर भरावा लागतो.
पूर्वी, सिलिंडर भरण्यासाठी ‘कार्बन डाय ऑक्साईड’ला प्राधान्य दिले जात असे. परंतु तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे एलपीजी सिलिंडरच्या लहान आवृत्त्यांसारखे दिसणारे कॉम्प्रेस्ड एअर सिलिंडर हे एअर पिस्तूल सिलिंडर भरण्यासाठी वापरले जातात. पुष्पेंदर हा उत्तर प्रदेशातील बागपत जिह्याचा असून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत भाग घेतलेला नसला, तरी तो भारतीय हवाई दलाच्या संघाचा वरिष्ठ सदस्य आहे. जवळपास महिनाभरापूर्वी त्याने आईला गमावले होते. ‘आम्ही आशा करतो की, पुष्पेंदर शस्त्रक्रियेनंतर 90 ते 95 टक्के ठीक होईल’, असे त्याच्या प्रशिक्षकाने सांगितले. सुदैवाने पुष्पेंदरचा नेमबाजीचा हात सुरक्षित आहे, असेही त्याने स्पष्ट केले.









