प्रतिनिधी/ पणजी
आजोशी, इल्हास येथे 36 वर्षीय महिलेचा पाठलाग करून, तिच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी संशयित साईश बोरकर (28) याच्यासह तिघां विरोधात आगशी पोलिसांनी भा.दं.सं. कलम 504, 323, 506(2), 447, 354 ड व 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयित साईश हा सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचा भाऊ आहे.
ही घटना रविवार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.45 च्या सुमारास घडली होती. तर या प्रकरणी पोलिसांनी गेल्या 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद केला आहे. नेवरा, तिसवाडी येथे संशयित आरोपी साईश बोरकर याने तक्रारदार व तिच्या मैत्रिणींना अडवून मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयिताने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने फिर्यादीचा पाठलाग करून तिच्या घरात घुसला आणि तिला मारहाण केली.
महिलेचा पाठलाग करणे, आजोशी-इल्हास येथील फिर्यादींच्या घरात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणे, धमकी देत मुख्य दरवाजाची तोडफोड करणे, या प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे आगशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश हरिजन करीत आहेत.









