हेस्कॉमचे अधिकारी नसल्याचा निर्वाळा
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील भटवाडा येथील धबधब्याच्या ठिकाणी पार्टी करणाऱ्या बेळगावातील डॉक्टर्ससह काहीजणांवर खानापूर वनाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पार्टीच्या ठिकाणी वापरण्यात आलेले वाहन हे खासगी असून या प्रकरणाशी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण खानापूरच्या वनाधिकारी कविता यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिले आहे. तालुक्यातील पश्चिम भागात अनेक ठिकाणी निसर्गसौंदर्य असून याठिकाणी धबधबे आहेत. या धबधब्यांच्या ठिकाणी वर्षापर्यटनासाठी तालुक्याबाहेरील दूरवरून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. या धबधब्यांच्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांनी हुल्लडबाजी केल्याने परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच यावर्षी वर्षापर्यटनाचा आनंद लुटताना अनेकांना जीव गमवावा लागला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तालुक्यातील जंगलातील पर्यटनस्थळांवर कडक बंदीचे आदेश बजावले आहेत. त्याची दखल घेत वनखात्याने तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
रविवार दि. 30 जुलै रोजी बेळगाव येथील काही डॉक्टर व इतर लोक भटवाडा धबधब्याजवळ वर्षापर्यटनासाठी आले होते. याठिकाणी त्यांनी तंबू ठोकून ओली पार्टी केली. याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पार्टी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात डॉक्टर्ससह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पार्टीत बेळगाव येथील नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्टीच्या ठिकाणी वापरण्यात आलेले वाहन (क्रमांक केए 22-डी-5615) हेस्कॉमसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. हे वाहन पार्टीच्या ठिकाणी असल्याने हेस्कॉमचेच अधिकारी असल्याचा काहींचा समज होता. मात्र हे वाहन भाडेतत्त्वावर असल्याने रविवारी मालक स्वत: वापरत होते. वाहनमालकाने याठिकाणी बेळगाव येथील पर्यटकांना पार्टीसाठी आणले होते. त्यामुळे याप्रकरणाशी हेस्कॉमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण खानापूरच्या वनाधिकारी कविता यांनी दिले आहे. वाहन मालकासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनप्रदेशातील पर्यटनास येऊ नये
खानापूरच्या वनाधिकारी म्हणाल्या, तालुक्यातील कुठल्याही धबधब्याच्या ठिकाणी अथवा राखीव वनप्रदेशात पर्यटकांना सध्या बंदी असल्याकारणाने पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत खानापूर तालुक्याच्या वनप्रदेशातील पर्यटनास येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. जर याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.









