जलमार्गाखालील जहाजाच्या जुन्या सांगाड्यामुळे घटना
वास्को : मुरगाव बंदरानजीक एक बार्ज बुडाल्याने लाखोंचे नुकसान झाले. या बार्जमध्ये आयर्न ओर पॅलेटस् हा माल भरलेला होता. अर्धी अधिक बार्ज पाण्याखाली गेली. बार्जवरील खलाशांना वाचवण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी घडली. उपलब्ध माहितीनुसार सदर बार्ज मुरगाव बंदराच्या दिशेने जात होती. बंदरात धक्क्याला लागण्यापूर्वी काही अंतरावर या जहाजात पाणी शिरू लागले व जहाज हळुहळु बुडू लागले. त्यामुळे जहाजावरील आठ खलाशांची सुटका करण्यात आली. त्यानंतर जहाज अर्धेअधिक पाण्याखाली गेले. आजही ते जहाज त्याच स्थितीत आहे. या घटनेत लाखोंची नुकसानी झाली आहे.
सदर घटनेसंबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर मालवाहू जहाज ज्या मार्गाने बंदराच्या दिशेने जात होते. त्या मार्गावर समुद्रात यापूर्वी दोन जहाजे बुडाली होती. त्यातील एक जहाज काढण्यास यश आले होते. मात्र, एक जहाज आजही त्या पाण्यात रूतलेले असून त्या जहाजाचा सांगाडा त्या मार्गावरून प्रवास करताना इतर जहाजांचे नुकसान करीत आहे. रविवारी बुडालेली बार्ज समुद्रातील जहाजाच्या सांगाड्याला अडकल्याने त्या बार्जला भोक पडले. त्यामुळे बार्जमध्ये पाणी शिरून ती बुडाली. सदर बुडालेली बार्ज पाण्यावर दिसत असली तरी ती जुन्या जहाजाच्या सांगाड्याला अडकलेली असल्याने बाहेर काढण्यास अद्याप यश आलेले नाही.









