चोरीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ : 57 हजाराची रोकड लंपास
प्रतिनिधी/ बेळगाव
बस्तवाडजवळील एका कार शोरूममध्ये चोरीची घटना घडली आहे. शनिवारी 6 मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी 57 हजार 170 रुपये रोकड पळविली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या या शोरूममधील चोरीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
आकाश शहापुरे, रा. हलगा यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. आकाश हे टोयाटो शोरूममध्ये कॅशियर आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवार दि. 5 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता कॅश काऊंटर बंद करण्यात आले होते. पण शनिवारी सकाळी 6.15 वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिलिव्हरी डोअरचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश केला आहे. कॅश काऊंटर फोडून त्यामधील रोकड लांबविली आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









