आल्त दाबोळी भागात विमानतळाच्या दिशने येणारी एक कार सिग्नलच्या खांबाला धडक देऊन उलटली. या अपघातात कारमधील तिघे युवक सुखरूप बचावले. वास्को पोलिसांनी चालकाविरूध्द या अपघात प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहितीनुसार शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. केपे येथील तीन युवक आपल्या कारमधून दाबोळी विमानतळाच्या दिशने भरधाव येत होते. वालीस जँक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱया दाबोळीतील नाक्यावर त्यांचा वाहनावरील ताबा गेल्याने त्यांनी थेट सिग्नलच्या खांबाला धडक दिली. त्यामुळे सिंग्नलचा खांब आडवा होऊन कारही तीथेच उलटली. सुदैवाने कारमधील तिघेही सुखरूप बचावले. त्यांच्यापैकी एकाला दाबोळी विमानतळावरून राज्याबाहेर उड्डाण करायचे होते. वास्को पोलिसांनी या अपघात प्रकरणी निष्काजीपणाचा ठपका ठेऊन चालकाविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.









