विविध प्रकारचे ‘जुगाड’ करण्यासाठी आपला देश प्रसिद्ध आहे. येथे लोकांच्या डोक्यांमध्ये अनेक प्रकारच्या अद्भूत आणि अनाकलनीय कल्पना येत असतात. काही जुगाड मात्र खरोखरच कौतुक करण्यासारखे असतात. जुगाडकर्त्याची कल्पकता आणि बुद्धीमत्ता त्यातून स्पष्ट होते. आपल्या घरातील खाट किंवा पलंगाचीच कार बनविल्याचा एक व्हिडीओ सध्या प्रसारित होत आहे. खाटेला खाली चार चाके लावण्यात आली आहेत. वरच्या बाजूला समोर ड्रायव्हिंग व्हील आहे. एक व्यक्ती या खाटेवर आरामात मांडी घालून बसून ती चालवत आहे आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य या खाटरुपी कारवर बसले आहेत, असे दृष्य या व्हिडीओत पहावयास मिळत आहे. तो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करीत असून तो सोशल मिडियावर सध्या चांगलाच लोकप्रिय होताना दिसून येतो.
या ‘कार’वर दोन किंवा चार नव्हे, तर सात ते आठ माणसेही बसू शकतात. ही कार मार्गावरही धावू शकते, असे या जुगाडकर्त्याचे प्रतिपादन आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला असून अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओ इतक्याच या प्रतिक्रियाही वाचण्यासारख्या आहेत. ‘ हे इंडियन टॅलेंट असून यामुळे जगातील साऱ्या कार कंपन्यांना धडकी भरली आहे,’ अशी एक बोलकी प्रतिक्रिया पहावयास मिळते. आपल्या देशात उपजत बुद्धीमत्ता आणि कल्पकतेची कमतरता नाही. मात्र, अशी विशेष बुद्धी किंवा तंत्रवैज्ञानिक प्रज्ञा असलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या टॅलेंटला योग्य ती दिशा आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे अशा प्रकारच्या व्हिडीओंवरुन दिसून येते. तंत्रविज्ञानात ‘आत्मनिर्भर’ होणे हाच देशाच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे, हे अशा उदाहरणांवरुन दिसून येते. अत्याधुनिक तंत्रवैज्ञानिक संशोधन करण्यासाठी भारत सरकारनेही प्रोत्साहन देण्याच्या अनेक योजना साकारल्या आहेत.









