खासगी बसची कारला धडक
बेळगाव : भरधाव बस व कार यांच्यात झालेल्या अपघातात माणगाव (ता. चंदगड जि. कोल्हापूर) येथील एका कारचालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी कुद्रेमनी फाट्यावर ही घटना घडली असून रात्री काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बाळू यमाजी अर्जुनवाडकर (वय 64) रा. माणगाव असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते आपल्या कारमधून माणगावहून बेळगावकडे येत होते. उचगाव येथे त्यांचा मुलगा असतो. त्यावेळी कुद्रेमनी फाट्याजवळ बसची कारला धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या बाळू यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. बसचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. खासगी कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसची धडक बसून हा अपघात झाला. अपघातानंतर बस रस्त्याशेजारील झाडावर आदळली असून या अपघातात पाच ते सहा जण किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात आले.









