एक गंभीर जखमी, सुदैवाने अनेक जण बचावले
बेळगाव : बेळगाव-हिंडलगा रोडवर कार आणि टमटम रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षामधील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सुरेश परशराम शिंदे (रा. विनायकनगर, हिंडलगा) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बेळगावकडून टमटम रिक्षा (क्रमांक केए 22, ए 8189) हिंडलग्याकडे जात होती. तर समोरून कारगाडी (क्रमांक केए 23, एन 8961) येत असताना साई मंदिर शेजारीच या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टमटम रिक्षा उलटली झाली. त्यामध्ये असलेल्या सुरेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर या रिक्षामधील इतर प्रवाशी सुदैवाने बचावले आहेत. या अपघातानंतर जखमी झालेल्या सुरेश यांना तातडीने उपचारासाठी हलविले. या घटनेची माहिती दक्षिण रहदारी पेलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी अपघाताचा पंचनामा केला.









