मनपा सक्रिय : धोकादायक वृक्ष-फांद्या हटविण्याची होतेय मागणी
बेळगाव : शहर आणि बाजारपेठेतील धोकादायक झाडे व फांद्या मनपाने हटविल्या आहेत. त्यामुळे नागरिक व व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. व्यापारीवर्गाने वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटवाव्यात, अशी मागणी केली होती. मनपाने शनिवारी ही मोहीम हाती घेतली आहे. आयुर्मान संपलेल्या झाडांचा धोका शहरात वाढला असून विद्युत वाहिन्या आणि वाहतुकीसाठी त्या अडचणीच्या ठरत आहेत. मनपाने शनिवारी मारुती गल्ली, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक येथील झाडांच्या फांद्या हटविल्या. त्यामुळे बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला. शिवाय वीजवाहिन्यांचा धोका कमी झाला आहे. वनखाते वृक्षांची लागवड करून झाडांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरांतर्गत लावलेल्या झाडांच्या संवर्धनाचे काम मनपावर आहे. धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनखाते आणि मनपाची परवानगी आवश्यक आहे. दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळून खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मनपा आणि वनखात्याने सर्व्हे करून झाडे हटवावीत, अशी मागणी होतआहे. शहरात वर्दळीच्या ठिकाणी आणि वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या लोंबकळतात. वादळ आणि पावसामुळे त्या कोसळून मालमत्तेचे नुकसान होते. जीवितहानी होण्याचाही धोका उद्भवतो. यासाठी धोकादायक झाडे आणि फांद्या हटविण्याची मोहीम तीव्र करावी, अशी मागणी होत आहे.









