बसथांब्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याने निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया
बेळगाव : शहरामध्ये महत्त्वाच्या रहदारी रस्त्यांवर अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र या बसथांब्यांचा अपेक्षित वापर होत नसल्याने बसथांबे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक बसथांबे वापराविना पडून असल्याने त्याठिकाणी गवत वाढून कचऱ्याच्या कुंडी बनले आहेत. चन्नम्मा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर तालुक्याच्या उत्तर भागातील गावांसह उपनगरांमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी लहान-लहान बसथांबे उभारण्यात आले आहेत. काकती, कडोली, होनगा, कंग्राळी खुर्द, अगसगे, हंदिगनूर या गावांसह वैभवनगर, आझमनगर, शाहूनगर, ज्योतीनगर, एपीएमसी, संगमेश्वरनगर, सदाशिवनगर आदी उपनगरांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना उपयोगी व्हावे, याकरिता बसथांबे उभारण्यात आले आहेत. यामध्ये मोजक्याच बसथांब्यांचा नागरिकांकडून उपयोग केला जातो. तर आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात आलेले बसथांबे निरुपयोगी ठरले आहेत. सदर बसथांब्यात एकही प्रवासी थांबत नाही. त्यामुळे बसथांब्यांमध्ये खुरटी झुडपे व गवत वाढले आहे. त्यामुळे बसथांब्याला कचराकुंडीचे स्वरुप आले आहे. अशा प्रकारचे बसथांबे अनेक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. तरी त्याचा उपयोग होत नसल्याने निधी वाया जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी आवश्यक ठिकाणी बसथांबे उभारण्याची मागणी केली जात आहे.









