उत्तराखंडमधील दुर्घटना, काळोखात बचावकार्य, 18 जखमी
वृत्तसंस्था/ नैनिताल
30 हून अधिक पर्यटकांनी भरलेली एक बस उत्तराखंडमधील नैनितालमध्ये दरीत कोसळून रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. हरियाणातून काही शाळकरी विद्यार्थी नैनितालला आले असताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. तथापि, बहुतांश विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री अंधारामध्ये मदतकार्य सुरू होते.
दुर्घटनाग्रस्त बस एका शाळेची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सदर बसमध्ये 30 जण प्रवास करत होते. त्यापैकी काही जणांना वाचवण्यात यश आले असून काहींचा शोध सुरू आहे. हा अपघात अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. सदर विद्यार्थी हरियाणातील हिसार येथून नैनिताल येथे भेट देण्यासाठी आले होते. एसडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहोचून इतर बचाव पथके आणि स्थानिक पोलिसांसह संयुक्त बचावकार्य केले. बसमधील 18 जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.









