चार माणसे एकत्र जमली की खाणे हे आलेच. बरेच कार्यक्रम तर केवळ खाण्यासाठीच आयोजित केलेले असतात. शक्यतो असे कार्यक्रम एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा चांगल्याशा हॉटेलात आयोजित केले जातात. मात्र कित्येकदा खाण्यापिण्याचा हा आनंद लुटताना अनेक जण इतके बेभान होतात, की त्यांना नंतर आपल्यासमोर काय ‘वाढून ठेवले’ जाणार आहे याचे भानही रहात नाही.
असाच अनुभव अलिकडेच इंग्लंडमधील टॉबी विल्सन याला आला. तो एका बडय़ा कंपनीत एचआर व्यवस्थापक आहे. नुकत्याच झालेल्या ख्रिसमसच्या आधी दोन दिवस त्याच्या मित्राने रात्री एका पाटींचे आयोजन केले होते. मित्राच्या घरीच घरीच हा कार्यक्रम होता. तो आटोपून घरी जाताना वाटेत एका हॉटेलात जाऊन त्याला बर्गर खावासा वाटला. त्याची किंमत होती 6.50 पाऊंड. पण हॉटेलवाल्याने बिल तयार करताना 666.50 पाऊंडाचे केले. याची भारतीय रुपयांमध्ये किंमत 66 हजार रुपयांपेक्षा जास्त होते. पार्टीच्या धुंदीत त्याने एवढी मोठी रक्कम चुकतीही केली. कार्डाने ती चुकती केल्याने त्याच्या एकदम ते लक्षातही आले नाही. मात्र, घरी जाऊन त्यांनी मेसेज पाहिला तेव्हा बरीच मोठी रक्कम कापली गेल्याचे लक्षात आले. काही वेळाने त्याला बर्गर खाल्ल्याची आठवण झाली. आपल्या मित्राला कळवून त्याने त्या हॉटेलवाल्याशी संपर्क केला. हॉटेलवाल्याने चूक तर मान्य केली पण पैसे बँकेत जमा झाल्याने विल्यन याला आता बँकेत खेटे मारावे लागत आहेत. बँकवाले त्याच्याकडे पावती मागत आहेत, जी त्याने घेतलेली नाही. परिणामी, अजूनही त्याला हे जास्त दिलेले पैसे मिळालेले नाहीत.









