राज्यसभेत गहजब, देण्यात आला चौकशी आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राज्यसभेतील काँग्रेस खासदार आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या सदनातील आसनाखाली 50 हजार रुपयांच्या नोटांचा गठ्ठा आढळल्याने संसद परिसरात मोठा गोंधळ उडला आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
शुक्रवारी सकाळी राज्यसभेच्या कामकाजाचा प्रारंभ झाल्यानंतर सदनाचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सदस्यांना ही माहिती दिली. राज्यसभा सदनाची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना 222 क्रमांकाच्या आसनाखाली 50 हजार रुपयांच्या नोटांचा गठ्ठा सापडला. हे आसन अभिषेक मनु सिंघवी यांचे असल्याचे नंतर चौकशीअंती स्पष्ट झाले. राज्यसभा सदनाची सुरक्षा पाहणी केली जात असताना या नोटा सापडल्या आहेत, अशी माहिती धनखड यांनी दिली.
सिंघवी यांचा इन्कार
सिंघवी यांनी हे पैसे आपले असल्याचा इन्कार केला आहे. आपण कधीच इतके पैसे घेऊन संसदेत येत नाही. आपल्या खिशात केवळ 500 रुपयांची एक नोट असते. आपल्या आसनाखाली 50 हजार रुपयांच्या नोटांचा गठ्ठा सापडला ही बाब अध्यक्षांनी घोषित करेपर्यंत आपल्याला माहितही नव्हती. हे पैसे आपले नाहीत, हे मी स्पष्ट केले आहे. मात्र, ही घटना आश्चर्यकारक आहे. हा प्रकार कसा घडला हे समजून घ्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया सिंघवी यांनी व्यक्त केली.
चौकशीचा आदेश
खासदाराच्या आसानाखाली 50 हजार रुपयांची रक्कम आढळणे, हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आदेश देण्यात येत आहे. या नोटा कोणी सभागृहात आणल्या आणि त्या विशिष्ट आसनाखाली कशा सापडल्या, यासंबंधी चौकशी केली जाईल. सदनाच्या सुरक्षा व्यवस्थेकडून ही चौकशी केली जाईल, अशी घोषणा जगदीप धनखड यांनी शुक्रवारी केली.
खर्गे यांची टीका
सापडलेल्या पैशांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय सदस्याचे नाव उघड करावयास नको होते. तसे केल्याने सदस्यासंदर्भात लोकांचे मत वाईट होऊ शकते. चौकशी पूर्ण केल्यानंतरच यासंबंधीची माहिती बाहेर यावयास हवी होती, असा आक्षेप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रकारानंतर नोंदविला.
रिजिजू यांचा प्रतिवाद
खर्गे यांच्या टीकेचा प्रतिवाद केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी केला. ज्या सदस्याच्या आसानाखाली ही रक्कम सापडली, त्याचे नाव उघड करण्यात काहीही अयोग्य नाही. जर हे पैसे त्या खासदाराचे असतील आणि ते पडल्याचे त्याच्या लक्षात आले नसेल, तर तो ते परत घेऊ शकतो. तसेच, राज्यसभा अध्यक्षांनी संबंधित सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांच्यावर कोणताही आरोप केलेला नाही, किंवा त्यांच्याविषयी कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. केवळ माहिती म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे अध्यक्षांच्या या कृतीतून कोणताही विपरीत अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
चौकशीच्या निर्णयाला पाठिंबा
या गंभीर प्रकरणाच्या चौकशीच्या निर्णयाला अनेक राज्यसभा खासदारांनी पाठिंबा दिला आहे. सिंघवी यांनीही चौकशीची मागणी केली. सध्याचे युग डिजिटल व्यवहारांचे आहे. अशा स्थितीत इतकी मोठी रोख रक्कम राज्यसभागृहात कोणी आणली, याची चौकशी होणे अत्यावश्यकच आहे, अशी टिप्पणी किरण रिजिजू यांनी केली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि इतर पक्षांनीही या प्रकारासंबंधी चिंता व्यक्त केली असून चौकशीच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.









