रात्री 12 पर्यंत करावे लागतेय काम : वेळेत जेवण नाही-झोपेविना होताहेत हाल
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला बेंगळूरवरून मंत्री, आमदारांसह अधिकारी आले आहेत. त्यांची सोय करताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. रात्री 1 ते 1.30 वाजेपर्यंत काम करावे लागत आहे. यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कार्यालय स्थापन करून देण्यात आले आहे. त्या ठिकाणी राहून आलेल्या मंत्री, महोदयांसह अधिकाऱ्यांची राहण्याची सोय करावी लागत आहे. बेंगळूरवरून अधिकारी आल्यानंतर त्यांना लॉजिंगमध्ये सर्व सोयीयुक्त रूम उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बऱ्याचवेळा रात्री 12 वाजता फोन करून आमदार व कर्मचारी तक्रारी करत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत.
या कामामुळे वेळेत जेवण नाही, झोप नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करून पुन्हा पहाटे कार्यालयात यावे लागत आहे. या सर्वांची सोय करत असताना प्रशासनाचे या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक अधिकारी रूम नसल्याच्या तक्रारी करत आहेत. सर्व हॉटेल्स व लॉजिंग फुल्ल झाली आहेत. त्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. या अधिवेशनाच्या कामामुळे महानगरपालिकेतील कामे मात्र प्रलंबित आहेत. जनतेला नाहक हेलपाटे घालावे लागत आहेत. आता 15 डिसेंबरपर्यंत हे काम करावे लागणार आहे. त्यानंतर कार्यालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेलाही महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी भेटायचे कठीण झाले आहेत. एकूणच अधिवेशनामुळे बेळगावमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.









