वृत्तसंस्था / बेंगळूर
येथे सुरू असलेल्या 2025 च्या क्रिकेट हंगामातील दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पूर्व विभागाविरुद्ध खेळताना उत्तर विभागाच्या यश धूलने शानदार शतक झळकविले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर विभागाने पहिल्या डावात 405 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यातील शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर उत्तर विभागाने दुसऱ्या डावात 2 बाद 388 धावा जमवित पूर्व विभागावर 563 धावांची भक्कम आघाडी मिळविली. यश धूलने 157 चेंडूत 133 धावा तर कर्णधार अंकितकुमारने नाबाद 168 धावा जमविल्या आहेत. धूल आणि अंकितकुमार यांनी दुसऱ्या गड्यासाठी 240 धावांची द्विशतकी भागिदारी केली.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मध्यविभागाने नॉर्थइस्ट विभागाविरुद्ध खेळताना भक्कम आघाडी मिळविली आहे. मध्यविभागाने दुसऱ्या डावात 6 बाद 331 धावा जमवित नॉर्थइस्ट विभागावर 678 धावांची आघाडी मिळविली आहे.









