कोल्हापूर :
गेली अकरा दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. मॉन्सूनूपर्व या पावसाचा शेतीसह जनजीवनावर परिणाम झाला. नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. या पावसाने नागरिक मेटाकुटीला आले होते. अखेर बुधवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. यामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना सूर्यदर्शन झाल्यामुळे दिलासा मिळाला.
मान्सूनपूर्व पावसाने यंदा गेल्या अनेक वर्षातीर रेकॉर्ड मोडले आहे.कधी नव्हे इतका मॉन्सूनपूर्व पाऊस झाला आहे.मे महिन्यात प्रथमच पंचगंगेसह जिल्ह्यातील अन्य नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत.तर जिल्ह्यातील धबधबेही प्रवाहित झाले.मात्र खरीपाच्या पेरण्या न झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.शेतपिकाचे नुकसान झाले. तसेच जनजीवनावर या पावसाचा चांगलाच परिणाम झाला. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांना मॉन्सूनपूर्व पाऊस थांबण्याची प्रतीक्षा होती.
मंगळवारी रात्रीपर्यंत पाऊस होता. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली.सकाळी सूर्यदर्शन झाले. ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसभरात पाऊस पडला नाही. तर पावसाने उसंत घेतली असली तरी पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर होती.रात्री राजाराम बंधाऱ्यावर 20 फूट 5 इंच इतकी पाणीपातळी होती.








