6.5 अब्ज डॉलर्सची मोठी वृद्धी ः 531 अब्ज डॉलर्सवर पोहोचला भांडार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आर्थिक आघाडीवर भारताला दिलासा देणारे वृत्त आहे. विदेशी चलन साठय़ात सातत्याने होणाऱया घसरणीला आता ब्रेक लागला आहे. विदेशी चलन साठय़ात आता वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेनुसार 28 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात 6.561 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. एकूण आकडा 531.081 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तर त्यापूर्वीच्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात 3.847 अब्ज डॉलर्सची घट होत आकडा 524.52 अब्ज डॉलर्सवर आला होता.
28 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात वाढ झाली असून एक वर्षातील ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये विदेशी चलन साठा आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर म्हणजेच 645 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. परंतु त्यानंतर विदेशी गुंतवणुकदारांकडून सुरू झालेली समभागांची विक्री, महाग होत चाललेली आयात, रशिया-युक्रेन युद्धामुळे सातत्याने विदेशी चलन साठय़ात घसरण दिसून आली होती.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्यासाठी आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला होता. आरबीआयने याकरता डॉलर्सची विक्री केली होती. यामुळे देखील वेदशी चलन साठय़ात घट झाली होती. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढवत असल्याने डॉलर मजबूत होत जाणार आहे. यातून विदेशी गुंतवणुकदारांनी काढता पाय घेतल्यास विदेशी चलन साठय़ात घट होण्याची शक्यता आहे. विदेशी चलन साठा कमी होत 510 अब्ज डॉलर्सपर्यंत खालावू शकतो असे अनेक जाणकारांचे मानणे आहे.
सुवर्णसाठाही वाढला
मूल्याच्या संदर्भात देशातील सुवर्णसाठा 55.6 कोटी डॉलर्सने वाढून 37.76 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) 18.5 कोटी डॉलरने वाढून 17.62 अब्ज डॉलर्स झाला असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले.









