जाफरवाडी येथील शेतकऱ्याचा स्तुत्य उपक्रम : अन्य जणांनाही प्रोत्साहन मिळण्यास मदत : जमिनीची पत सुधारणार
वार्ताहर/कडोली
शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न कडोली-जाफरवाडी येथील शेतकरी नेहमी करीत असतात. आता जैविक खताच्या वापरातून जमिनीची पत सुधारण्याबरोबर उत्पादनातही वाढ होते. हे जाफरवाडी येथील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांच्या या जैविक खताच्या प्रयोगामुळे अन्य शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली आहे. गेली काही वर्षे रासायनिक खतांचा अतिवापर, तणनाशक औषध आणि शेणखताच्या अभावामुळे शेत जमिनीची पत खालावली आहे. दिवसेंदिवस उत्पादनातील वाढ कमी होत चालली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवता येत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय नुकसानीत येत आहे. आता हे सर्व लक्षात घेऊन शेणखत, गांडूळ खत आणि जैविक खताच्या वापराशिवाय शेती व्यवसायाला बहर येणार नाही, याची प्रचिती शेतकऱ्यांना आली आहे.
नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या सहकार्यातून जाफरवाडी येथील प्रगतशील शेतकरी महादेव कलाप्पा पाटील यांनी जैविक खताचा वापर करून पिकाचे भरघोस उत्पादन कसे घेतले आहे. हे येथील आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे. गेली 5-6 वर्षे झाली सदर शेतकरी ऊस, मिरची, भात, कोबी, फ्लॉवर पिकाचे उत्तम उत्पादन घेत आहेत. या जैविक खताच्या वापरामुळे जमिनीची पत सुधारण्यास मदत झाल्याचे शेतकरी महादेव पाटील यांनी सांगितले. पार पडलेल्या या शेतकरी मेळाव्यास नवभारत फर्टिलायझर्सचे विभागीय मॅनेजर भरमा सांबरेकर, शेतकरी भाऊराव पाटील, श्रीनाथ पाटील, रमेश अगसगेकर, अक्षय अगसगेकर, कंपनीचे राघवेंद्र लामले, शिवाजी पाटील, अभिषेक पाटील, श्रीमती रेखा पाटील आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









