उलाढाल वाढली, नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तुंनाही पसंती
प्रतिनिधी / बेळगाव
अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शनिवारी बाजारात सोन्या-चांदीची खरेदी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीला नागरिकांनी पसंती दिली. सराफ दुकानांसह खडेबाजार येथील पोतदार ज्वेलर्समध्ये नागरिकांची गर्दी वाढली होती. याबरोबरच नवीन दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांनी खरेदी केल्या. त्यामुळे शनिवारी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बाजारात उलाढाल वाढली होती.
गेल्या 15 एप्रिलपासून सोने-चांदीच्या किमती घसरणीवर आहेत. ही घसरण मोठी नसली तरी किंमत न वाढल्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अनेकजण यादिवशी सोने-चांदी आणि इतर वस्तुंची खरेदी करतात. त्यामुळे शोरूम, सराफ दुकाने आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये गर्दी वाढली होती. गणपत गल्ली, समादेवी गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, काकतीवेस रोड, शहापूर, वडगाव यासह उपनगरात असलेल्या सराफ दुकान व शोरूममध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.
अक्षय्य तृतीया, रमजान ईद आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती, बसवेश्वर जयंती, परशुराम जयंती एकाच दिवशी आल्याने शहरात खरेदीची लगबग पाहायला मिळाली. लग्नसराईला सुरुवात झाल्याने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सोने, चांदींच्या वस्तू, चेन, ब्रेसलेट, अंगठी, नेकलेस, विविध हार, मंगळसूत्र यासह चांदीचे ताट, तांब्या, फुलपात्र, देवांच्या मूर्ती, समई, निरांजन आदींची खरेदी झाली. बेळगावसह चंदगड आणि गोवा येथून ग्राहक दाखल झाले होते.









