टाटा मोटर्सला द्यावे लागणार 766 कोटी रुपये : सिंगूरमधील प्रकल्पाचे प्रकरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या सिंगूरमध्ये नॅनो कारच्या निर्मितीसाठी निर्माण करण्यात आलेला प्रकल्प बंद झाल्यामुळे गुंतवणुकीवर झालेल्या नुकसानादाखल टाटा मोटर्स या कंपनीला व्याजासह 766 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. तीन सदस्यीय मध्यस्थ न्यायाधिकरण म्हणजे आर्बिटल ट्रिब्युनलने टाटा मोटर्सच्या बाजूने निर्णय देत पश्चिम बंगाल सरकारला दणका दिला आहे.
टाटा मोटर्स लिमिटेडकडून सिंगूरमध्ये ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पाकरता करण्यात गुंतवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गुंतवणुकीवर झालेल्या नुकसानावरून टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल विकास महामंडळ मर्यादितकडून भरपाई मिळावी म्हणून मध्यस्थ न्यायाधिकरणासमोर याचिका दाखल केली होती. तीन सदस्यीय मध्यस्थ न्यायाधिकरणाने सोमवारी सर्वसंमतीने टाटा मोटर्सच्या बाजूने निर्णय दिला आहे.
टाटा मोटर्सला एक सप्टेंबर 2016 पासून वार्षिक 11 टक्के व्याजासह 765.78 कोटी रुपये पश्चिम बंगाल विकास महामंडळ मर्यादितकडून दिले जावेत असे लवादाने स्वत:च्या आदेशात म्हले आहे. या सुनावणीवर झालेल्या 1 कोटी रुपयांचा खर्च देखील वसूल करण्याचा आदेश लवादाने दिला असल्याची माहिती टाटा मोटर्सने दिली आहे.
पश्चिम बंगालमधील तत्कालीन माकप सरकारने टाटा मोटर्सला नॅनो कार निर्माण करण्यासाठी सिंगूरमध्ये 1 हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. या जमिनीवर कारनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा मोटर्सने गुंतवणूक केली होती. परंतु या जमीन अधिग्रहणाला मोठा राजकीय विरोध झाला होता. या विरोधाचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीच केले होते. या विरोधामुळे टाटा मोटर्सला सिंगूरमध्ये प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय रद्द करावा लागला होता. टाटा मोटर्सने यानंतर गुजरातच्या साणंद येथे नॅनो कार निर्मितीचा प्रकल्प स्थापन केला होता.









