उच्च न्यायालयाची स्थगिती ः गुप्तचर यंत्रणांसोबत मिळून आढावा घेण्याचा निर्देश
वृत्तसंस्था/ चंदीगड
सुरक्षा कपातीला व्हीआयपी संस्कृतीवरील कारवाई ठरवत श्रेय घेऊ पाहणाऱया आम आदमी पक्षाच्या सरकारला मोठा झटका बसला आहे. पंजाब तसेच हरियाणा उच्च न्यायालयाने सुरक्षा कपातीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सरकारला सुरक्षा पुन्हा प्रदान करण्याचा आदेश देत उच्च न्यायालयाने याचा आढावा घेण्यास सांगितले आहे.
केंद्र तसेच राज्याच्या गुप्तचर यंत्रणांशी चर्चा घेतल्यावरच अशाप्रकारचा निर्णय घेतला जावा असे उच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना सांगितले आहे. तसेच उच्च न्यायालयाने सुरक्षेतील त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. माहिती जाहीर झाल्याने अनेक जण धोक्याच्या कक्षेत येतात. समाजकंटक याचा लाभ उचलू शकतात असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाल याची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस अगोदर पंजाब सरकारने त्याच्या सुरक्षेत कपात केली होती. त्याच्या सुरक्षेकरता तैनात 4 पैकी 2 कमांडो काढून घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीकेची झोड उठली होती. भगवंत मान सरकारने सत्तेवर आल्यावर सुरक्षेत कपात सुरू केली होती.









