माकपच्या चर्चासत्रावर मुस्लीम लीगचा बहिष्कार
►वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
देशात समान नागरी संहितेवरून (युसीसी) जोरदार चर्चा सुरू असताना विरोधी पक्षांनी याच्या विरोधात रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. परंतु केरळमध्ये या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. माकपने युसीसी विषयक चर्चासत्रात काँग्रेसला आमंत्रित केले नसल्याचे म्हणत मुस्लीम लीगने त्यावर बहिष्कार टाकला आहे. मुस्लीम लीग हा केरळमधील काँग्रेस आघाडीत सामील आहे.
केरळमध्ये इंडियन मुस्लीम लीग (आययुएमएल) काँग्रेसचा मुख्य घटक पक्ष आहे. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफचा हिस्सा आहे. माकपकडून आयोजित चर्चासत्राकरता आययुएमएलने मलप्पुरमच्या पनक्कडमध्ये एक बैठक बोलाविली होती. युडीएफमध्ये मुस्लीम लीग सामील असल्याने सर्व घटक पक्षांशी सल्लामसलत केल्यावरच कुठलाही निर्णय घेऊ शकते. काँग्रेस या लढाईत प्रमुख भूमिका बजावू शकते. युडीएफच्या अन्य कुठल्याही घटकपक्षाला चर्चासत्राकरता आमंत्रित करण्यात आलेले नाही. डावे पक्ष काँग्रेसला वगळून समान नागरी संहितेच्या विरोधात एक पाऊलही पुढे टाकू शकत नसल्याचा दावा आययुएमएलचे प्रदेशाध्यक्ष सैयद सादिक अली शिहाब थंगल यांनी केला आहे.
आययुएमएलचे वरिष्ठ नेते आणि आमदार पी.के. कुन्हालीकुट्टी यांनी या मुद्द्यावर मुस्लीम लीगनेच ठोस आंदोलनाचे नेतृत्व केल्याचे म्हटले आहे. घटनाविरोधी या पावलावर सादिल अली शिहाब लवकरच एका चर्चासत्राचे आयोजन करणार आहेत. यात सर्व संघटनांना आमंत्रित केले जाणार आहे. फूट पाडणाऱ्या चर्चासत्राची गरज नसून सौहार्द जपणाऱ्या चर्चासत्राची गरज आहे. अन्यथा भाजपलाच बळ पुरविल्यासारखे होणार आहे. दिल्लीत चर्चासत्राद्वारे सर्वांना एकजूट करण्याची गरज असल्याचे कुन्हालीकुट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
माकपचे चर्चासत्र, काँग्रेसला नाही आमंत्रण
माकपने युसीसी विरोधात स्वत:च्या मोहिमेंतर्गत कोझिकोडमध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले आहे. चर्चासत्राकरता बिगर सांप्रदायिक असलेल्या सर्व लोकांना आमंत्रित केले जाईल, परंतु काँग्रेसला आमंत्रित पेले जाणार नसल्याचे माकपचे राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन यांनी म्हटले आहे. माकपच्या या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे. देशात काँग्रेस पक्षच संसदेत समान नागरी संहितेला सर्वात प्रभावीपणे विरोध करू शकतो. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला बळ मिळेल, असे मुस्लीम लीगकडून नमूद करण्यात आले आहे.









