याचिका फेटाळली : हिंदू बाजूच्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार
वृत्तसंस्था /प्रयागराज/मथुरा
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद प्रकरणी दाखल 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. मुस्लीम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. मुस्लीम पक्षाचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. शाही ईदगाहचा अडीच एकर परिसर मशीद नसून भगवान श्रीकृष्णाचे गर्भगृह असल्याचे हिंदू बाजूचे म्हणणे आहे. हा वाद 1968 च्या कराराशी संबंधित असून इतक्मया वर्षांनंतर या कराराला आव्हान देणे योग्य नाही, असा युक्तिवाद मुस्लीम बाजूने केला होता. तसेच यासंबंधी खटला चालवता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. मुस्लीम पक्षाचा हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. शाही इदगाह समितीच्या वकिलांनी आदेश 7, नियम 11 अंतर्गत हिंदू बाजूने दाखल केलेल्या 18 याचिकांना उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात प्रार्थनास्थळ कायदा किंवा वक्फ बोर्ड कायदा लागू होत नाही, असा युक्तिवाद हिंदू बाजूने केला. शाही ईदगाह संकुल श्रीकृष्णाच्या जन्मभूमीच्या भूमीवर आहे. करारानुसार मंदिराची जमीन शाही इदगाह समितीला देण्यात आली होती, जी नियमांच्या विरोधात असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.









