केपीए’ने पाठिंबा काढला: 60 सदस्यीय विधानसभेत पक्षाचे 2 आमदार, बहुमतावर कोणताही परिणाम नाही
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारामुळे एका पक्षाने एन बिरेन सिंग सरकारला झटका दिला आहे. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने (केपीए) मणिपूरमधील एन बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा रविवारी काढून घेतला आहे. कुकी पीपल्स अलायन्सचे विधानसभेत दोन आमदार आहेत. पक्षाने रविवार, 6 ऑगस्ट रोजी राज्यपाल अनुसुईया उईके यांना लिहिलेल्या पत्रात पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. सध्याच्या संघर्षाचा दीर्घकाळ विचार केल्यानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारला पाठिंबा देण्यास काही अर्थ नाही, असे केपीएचे प्रमुख टोंगमांग हाओकिप यांनी स्पष्ट केले आहे.
कुकी पीपल्स अलायन्सचे मणिपूरच्या 60 सदस्यीय विधानसभेत दोन आमदार आहेत. सायकुलमधून किमनेओ हाओकीप हँगशिंग आणि सिंगतमधून चिनलुंथांग या ‘केपीए’च्या दोन्ही आमदारांचे आता सरकारला समर्थन राहणार नाही. तथापि, केपीएच्या या निर्णयामुळे सरकारला कोणताही धोका निर्माण होण्याची शक्मयता नाही. भाजपकडे सर्वाधिक 37 जागा आहेत. याशिवाय पक्षाला पाच एनपीएफ, सात एनपीपी आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसकडे पाच तर जेडीयूकडे एक जागा आहे.
मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा आणि विरोधकांची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीदरम्यान राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल अनसुईया उइके यांना विधानसभेचे अधिवेशन 21 ऑगस्टपासून सुरू करण्याची शिफारस केली आहे. अनेक नागरी समाज संघटनांकडून राज्यात सुरू असलेल्या संकटावर चर्चेसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मणिपूरमधील तणाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरीही काही हिंसक घटना घडत आहेत.









