वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे राजकीय पक्षांनी स्वत:च्या तयारीला वेग दिलाआहे. याचदरम्यान अण्णाद्रमुकला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे संघटन सचिव आणि माजी खासदार अन्वर राजा यांनी सोमवारी द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. अन्वर राजा हे दीर्घकाळापासून अण्णाद्रकुमधील प्रभावी अल्पसंख्याक नेते राहिले होते, खासकरुन रामनाथपुरम जिल्ह्यात ते प्रभावी होते. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या उपस्थितीत अन्वर राजा यांनी द्रमुकचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
केंद्रातील भाजप सरकारपासून तामिळनाडूला वाचविण्यासाठी माझ्यासमोर द्रमुकमध्ये सामील होण्यावाचून पर्याय नव्हता. भाजप तामिळनाडूवर हिंदी लादणे आणि राज्याच्या स्वायत्ततेला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अन्वर राजा यांनी यावेळी केला आहे.
भाजपचा खरा अजेंडा हा अण्णाद्रमुकला संपविणे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांचे कौतुक केले आहे. स्टॅलिन यांनी नेहमी राज्याच्या हिताकरता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि राज्याच्या अधिकारांचे रक्षण केले आहे. तामिळनाडूत स्टॅलिन यांची बरोबरी करणारा अन्य नेता नाही. स्टॅलिन हे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि द्रमुकला जनतेकडून मोठे समर्थन मिळेल असे अन्वर राजा यांनी म्हटले आहे.









