दोडामार्ग – वार्ताहर
चेतन चव्हाण मित्रमंडळाच्यावतीने सलग पाचव्या वर्षी दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात आज बुधवारी रक्तदान शिबिर संपन्न झाले. दोडामार्ग भाजपा व बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. या शिबिरात 53 जणांनी आज रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, दोडामार्ग तहसीलदार संकेत यमगर, पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, भाजपचे पदाधिकारी – कार्यकर्ते, चेतन चव्हाण मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील बहुतांशी रुग्णांना नजिकच्या बांबोळी अथवा म्हापसा उपजिल्हा रुग्णालयाचा उपचारासाठी आधार घ्यावा लागतो. अनेकदा शस्त्रक्रिया अथवा इतर आजारांवर रक्ताची गरज रुग्णाला लागते. मात्र अशावेळी मोठी अडचण त्या संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभी ठाकते .परिणामी त्याचा परिणाम उपचारावर होतो. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चेतन चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी गोवा मेडिकल कॉलेज व भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाचे शिबीर आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांना या उपक्रमाचा रक्ताची जुळवाजुळव करताना उपयोग झाला आहे आणि अनेकांचे प्राण वाचले आहेत. आजच्या शिबिरातील जवळपास 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.









