जोसेफ सिक्वेरा यांची मागणी, गैरकृत्यावर आळा आणण्यासाठी आपण आणि आमदार एकत्रित आलो
गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
डान्सबार, दलालाकडून लुबाडणूक, रात्रीची चालणारी गैरकृत्यांमुळे कळंगुटचे नाव बदनाम होत असून आमदार, पंचायत, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. मात्र हे सर्वजण याप्रकरणी एकमेकांकडे बोटे दाखवून हात वर करत आहेत. कळंगुटमधील गैरकृत्यांबाबत आपण कुणाला दोष देत नाही उलट हे सर्व गैरकृत्ये आणि वाढते डान्सबार पूर्णतः बंद करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांनी एकत्रित येऊन येणाऱया अधिवेशनात डान्सबार बंदीचे बिल आणावे, अशी मागणी कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. यावेळी उपसरपंच गीता परब, पंच स्वप्नेश वायंगणकर, मथायस पावलू डिसोझा उपस्थित होते.
गैरकृत्यांवर आवाज उठविण्यासाठी आम्ही एकत्र
आपण पोलीस, मुख्यमंत्री, आमदारांना याबाबत दोष देत नाही. येणाऱया अधिवेशनात डान्सबार बंद करण्यासाठी आमदारांनी एकत्रित येऊन बिल आणावे जेणेकरून कुणाची डान्सबार चालविण्याची हिंमत होणार नाही. आमच्या वरिष्ठांनी याबाबत कायदा आणावा. 11 नंतर क्लब चालतात ते बंद करावे. यापूर्वी आपण आमदारविरुद्ध बोलत होतो हे खरे असले तरी आज असे गैरकृत्यावर आवाज उठविण्यासाठी व ते बंद करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बेकायदेशीर डान्सबार कायदेशीररित्या जमिनदोस्त करणार
कळंगूट ग्रामसभेत काही नागरिक येऊन आम्हाला वेश्याव्यवसाय, डान्सबार आदी गैरकृत्य नको असे म्हणून आरडाओरडा करीत होते त्यांनी आपली घरे भाडेपट्टीवर दिलेली आहेत. कळंगुटच्या नागरिकांकडे आपण हात जोडून मागणी करतो अशा लोकांना आपल्या नावे घरे, रुम आदी भाडेपट्टीवर देऊ नका. पोलीस कारवाई होते की नाही हे सर्वांना माहीत आहे. उगाच बदनामकारक संदेश खूप व्हायरल करु नका. ज्यांनी बेकायदेशीररित्या रेस्टॉरंट, डान्सबार आदी सुरु केले आहे त्यांना आम्ही नोटीसी पाठविल्या असून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन ते जमीनदोस्त करणार असल्याची माहिती जोसेफ सिक्वेरा यांनी दिली.
दलालांमुळेच कळंगुटची जास्त बदनामी
कळंगूटमध्ये सर्व गैरकृत्येही रात्रीच्या वेळीच होतात. याला दलालच जबाबदार आहेत. तेच पर्यटकांना दारु, मुली आदींची आमिषे दाखवून विविध रेस्टॉरंट, डान्सबारमध्ये नेतात. नंतर पर्यटकांना ब्लॅकमेल करुन लुबाडणूक करण्याचे प्रकार होतात. पुण्याहून आलेल्या पर्यटकांना यास सामोरे जावे लागले. त्यांच्याकडून 75 हजार घेतले. दुसऱया दिवशी ते पर्यटक आमच्यापर्यंत आले व लेखी तक्रार दिली त्यावर आम्ही त्वरित कारवाई करून ते पैसे पुन्हा त्या पर्यटकांना परत केल्याची माहिती यावेळी सिक्वेरा यांनी दिली. असे विविध घटना घडल्याचे पुरावे आमच्यापर्यंत आल्याची माहिती त्यांनी दिली. आपण व त्या पर्यटकांनी कळंगुटमध्ये लेखी तक्रार दिली असताना पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने लुबाडले असे म्हटले आहे असे सिक्वेरा यांनी सांगितले.
आपण खुर्चीवर असेपर्यंत डान्स बारला थारा नाही
अबकारी खाते रात्री उशीरापर्यंत दारु विक्रीचा परवाना देते मग पंचायतीला कोण जुमानणार. ते पंचायतीला विश्वासात घेत नाही, असे सिक्वेरा म्हणाले. अबकारी खाते महसुलासाठी बारना उशिरापर्यंतची परवानगी देते. रात्रीच्या वेळी तासाला 10 पटीने अधिक पैसे वसूल करतात. त्यामुळे फक्त पंचायतीला बदनाम करू नका. आपण खुर्चीवर असेपर्यंत कुणालाच येथे डान्स बार सुरू करण्यास देणार नाही असे सिक्वेरा म्हणाले. पंचायतीला बदनाम करण्यासाठी पंच स्वप्नेश वायंगणकर यांना नाहक गुंतविण्यात आले आहे, अशी माहिती सिक्वेरा यांनी दिली.
रात्री 11 नंतर होणाऱया गैरकृत्यांना पोलीस जबाबदार
डान्सबार वा क्लबना आम्ही कधीच परवानगी दिलेली नाही मग मुख्यमंत्री वा इतर सरकारी अधिकारी कुठल्या आधारावर म्हणतात आम्ही त्यांना परवानगी दिली म्हणून. आम्ही केवळ रेस्टॉरंटना रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे त्यामुळे रात्री 11 नंतर चालणाऱया डान्सबार, क्लबांना सरकार व पोलीस जबाबदार असून पंचायतीचा कोणताही संबंध नाही, असे सिक्वेरा म्हणाले.
सरकारने पहाटेपर्यंत चालणाऱया क्लबबाबत फेरविचार करावा– गीता परब
राज्यात डान्सबार कायमस्वरुपी बंद करणारे बिल यायलाच पाहिजे असा पुनरुच्चार उपसरपंच गीता लक्ष्मण परब यांनी केला. जर सरकारने म्हटले आम्हाला महसूल पाहिजे आणि त्यासाठी पहाटेपर्यंत दारूसाठी अबकारी खाते परवाना देत असल्यास त्यासाठी सरकारने पर्यायी व्यवस्था करावी त्यासोबत पोलीस पहारा ठेवणेही तितकेच गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.









