ढोकेगाळी येथील घटना : विद्यार्थ्यांची भीतीने उडाली गाळण : बंदोबस्त करण्याची मागणी
खानापूर : तालुक्यातील ढोकेगाळी, हारुरी या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अस्वल अचानक रस्त्यावर येऊन दुचाकीस्वाराचा पाठलाग करू लागले. या रस्त्यावरून हारुरीला शाळेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अस्वलाला पाहून गाळण उडली. त्यांनी शाळेकडे न जाता पुन्हा गावाकडे धूम ठोकली आणि गावातील लोकांना याबाबतची माहिती दिली. गावकऱ्यांनी त्यानंतर विद्यार्थ्यांना हारुरी येथे शाळेला आणून सोडले. या घटनेत दुचाकीस्वार आणि विद्यार्थी अस्वलाच्या हल्ल्यातून वाचले आहेत. या परिसरात अस्वलांचा वावर वाढल्याने वनखात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. याबाबतची माहिती अशी की, हारुरी, ढोकेगाळी ही दोन गावे 1 कि. मी. अंतरावर आहेत. ढोकेगाळी येथील सोनाप्पा पाटील हे रोजच्याप्रमाणे दूध घेऊन खानापूरला आपल्या दुचाकीवरून येत होते. ढोकेगाळी, हारुरी हा रस्ता जंगलाचा आहे. या रस्त्यावर अचानकपणे दोन पिल्लांसह अस्वल रस्त्यावर येऊन सोनाप्पा पाटील यांच्या गाडीचा पाठलाग करू लागले.
गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोडले शाळेत
सोनाप्पा पाटील यांनी घाबरलेल्या अवस्थेत दुचाकीचा वेग वाढवत आपली सुटका करून घेतली. याच रस्त्यावरून शाळेसाठी येणारे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हे दृश्य पाहून गावाकडे पळ काढला. आणि गावातील नागरिकांना माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी या विद्यार्थ्यांना हारुरी येथे शाळेसाठी आणून सोडले.
दोन वर्षापूर्वी कौंदल येथील शेतकऱ्याचा मृत्यू
हारुरी, असोगा, शेडेगाळी, मणतुर्गा, होनकल, गंगवाळी, सावरगाळी, परिसरातील जंगलात अस्वलांचा वावर वाढल्याने वारंवार अस्वलांचे दर्शन होत आहे. अस्वलाच्या हल्ल्यांच्या घटनांतही वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी गंगवाळी गावात दोन अस्वले नागरिकांच्या दृष्टीस पडली होती. तर दोन वर्षांपूर्वी कौंदल येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. जंगली प्राण्यांच्या वाढलेल्या वावरामुळे शेतकरी व नगारिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने अस्वलासारख्या हल्लेखोर प्राण्यापासून संरक्षण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









