दक्षिण भारतात 19 स्थानांवर धाडी : काहींची धरपकड, साधनसामग्री हस्तगत
वृत्तसंस्था ./ नवी दिल्ली
धर्मांध जेहादी गटांवर केलेल्या जोरदार कारवाईत राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) दक्षिण भारतात 19 स्थानांवर धाडी घालून काही संशयितांची धरपकड केली आहे. या संशयितांकडून शस्त्रसाठा आणि प्रक्षोभक आशय असणारी सामग्रीही हस्तगत करण्यात आली आहे. विविध राज्यांच्या पोलिसांच्या सहकार्याने या धाडी टाकण्यात आल्या. मात्र, त्यांची सविस्तर माहिती देण्यात आली नाही.
एका विशिष्ट जेहादी गटाच्या विरोधात प्रामुख्याने हे धाडसत्र होते. या गटाचे हस्तक देशभरात दहशतवादी हल्ले घडविणे, समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, दहशतवादी हल्ल्यांसाठी तरुणांना भरकटविणे आणि त्यांची गटात भर्ती करुन घेणे, प्रक्षोभक साहित्याचे वितरण करणे, इत्यादी कारस्थाने या गटाकडून केली जात होती, याची माहिती मिळाल्याने या धाडी घालण्यात आल्या आहेत.
चार जणांना अटक
देशात दहशतवाद माजविण्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक करण्यात आली असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारागृहातील कैद्यांना धर्मांधतेचे धडे देण्याचेही त्यांचे कारस्थान होते. अटक करण्यात आलेले संशयित लष्करे तोयबा या इस्लामी दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याची माहिती आहे. चार संशयितांच्या घरांवर छापे घालण्यात आले असून त्यांच्यापैकी एकजण फरारी असल्याची माहितीही देण्यात आली. अटक केलेल्यांची नावे मोहम्मद उमर, मोहम्मद फैसल रब्बानी, तन्वीर अहमद आणि मोहम्मद फारुक अशी असून फरारी असलेल्याचे नाव जुनेद अहमद आहे.
व्यापक कटाचा भाग
देशात घबराट उडवून देण्याचे हे कारस्थान असून येत्या एक दोन महिन्यांमध्ये दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडींमध्ये संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीनुसार एनआयएने कारवाईची दिशा ठरविली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एक खेडे ‘स्वतंत्र’ म्हणून घोषित केले होते आणि त्याचे नावही बदलून अल् शाम असे ठेवले होते. तेव्हापासून एनआयएने डोळ्यात तेल घालून अशा कारवायांवर लक्ष ठेवले आहे.
इलेक्ट्रॉनिक साधने जप्त
या धाडींमध्ये इलेक्ट्रॉनिक साधनसमग्रीसह अनेक साधने आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. डिजिटल साधनसामग्री, प्रक्षोभक भित्तीपत्रके आणि हस्तपत्रिका, पँपलेटस् तसेच 7.3 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आणखी 3 संशयित सध्या एनआयएच्या हाती लागले नसून त्यांच्या शोधार्थ अभियान चालविले जात आहे. आता देशात लोकसभा निवडणूक जवळ आल्याने याच कालावधीत दहशतवादी कारवाया करण्याचे या संशयितांचे मनसुबे आहेत, अशी माहिती एनआयएला गुप्तचरांनी दिल्याने आणखी धाडीही घालण्यात येतील, अशी शक्यता प्राधिकरणाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. दहशतवादी संघटनांनी आता दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आसरा शोधण्यास प्रारंभ केला असून तेथून आपल्या कारस्थानांना आकार देण्याचे कृत्य ते करीत आहेत.
व्यापक कारस्थाने हाणून पाडणार
ड दहशतवाद्यांची खोलवर रुजलेली पाळेमुळे उखडण्यासाठी व्यापक अभियान
ड दहशतवाद्यांचे अ•s आता दक्षिण भारतात अधिक प्रमाणात असल्याचे उघड
ड आणखी काही संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी एनआयएकडून जाळे









