कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वालावल-कवठी मार्गावर वालावल हनुमान मंदिर येथे गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रस्त्या नजीक असलेले मोठे झाड पडल्याने या मार्गावरची वाहतूक काही काळ बंद होती. कालपासून जोरदार सुरु झालेल्या पावसामुळे हे झाड पडले. यावेळी मार्गावर वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र कोणतीही हानी किंवा नुकसान झालेले नाही. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत, चेंदवण हायस्कूलचे शिक्षक श्री नाईक व आदी ग्रामस्थाच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड मशीनच्या साह्याने कापून रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल एक तासानंतर वालावल- कवठी मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली.









