मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये समाविष्ट होणाऱ्या अन्य पक्षांमधील नेत्यांना मोठी जबाबदारी देण्यात येत आहे. या पक्षात नुकत्याच प्रवेश केलेल्या माजी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांना पक्षाच्या मध्यप्रदेश शाखेचे महामंत्रीपद देण्यात आले आहे. तर, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष जसपालसिंग अरोरा यांनाही प्रदेश महामंत्रीपद देण्यात आले आहे. निशा बांगरे यांना बेतुल मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. तथापि, त्यांना यावेळी वगळण्यात आले असले तरी प्रचारप्रमुखांच्या सूचीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. बांगरे यांनी आपली नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. त्या आता संपूर्ण राज्यात प्रचारदौरा करणार असून काँग्रेस उमेदवारांसाठी काम करणार आहेत. तथापि, त्यांनी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला असूनही त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.
अरोरा यांनाही मोठी जबाबदारी
20 वर्षे भाजपमध्ये राहूनही आपल्याला योग्य ते महत्व दिले नाही, या कारणासाठी भाजपचा त्याग करणारे सुखजिंदरसिंग अरोरा यांनाही काँग्रेसने मोठी जबाबदारी देऊन सामावून घेतले आहे. त्यांच्यावरही राज्यभर प्रचार करण्याचे काम सोपविण्यात आले असून त्यांनी या कामाला प्रारंभही केल्याचे दिसून येत आहे.









