सात तास वीजपुरवठा खंडित, चार तास वाहतूक खोळंबली, झाड कापण्यासाठी अग्निशामक दलाकडे अपुरी यंत्रणा, ग्रामस्थ भडकले, दलास यंत्रसामुग्री देण्याची आमदार डिलायला लोबो यांची मागणी

प्रतिनिधी /म्हापसा
पोरबावाडा शिवोली येथील कीर्ती विद्यालयाच्या जुन्या इमारतीच्या बाजूला असलेले भले मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे हे झाड कापण्यासाठी गेलेले म्हापसा अग्निशामक दलाकडे कर्मचारी वर्ग तसेच झाड कापणारे यंत्र व तज्ञ नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच आमदार डिलायला लोबो घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन सेवेस सदैव तत्पर असलेल्या अग्निशामक दलास आवश्यक साधनसुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दु. 4.30 वाजण्याच्या दरम्यान हे भले मोठे आंब्याचे झाड पावसामुळे मुळासकट खाली कोसळले. त्यात वीज पुरवठा खंडित झाला. या घटनेची माहिती सरपंच शर्मिला वेर्णेकर यांना मिळाल्यावर त्यांनी त्वरित सदर माहिती म्हापसा अग्निशामक दलास दिली. त्यावर उपअधिकारी सुरज शेटगांवकर, देवेंद्र नाईक, साईराज नाईक, प्रवीण गांवकर, गिरीश गावस यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आंब्याचे झाड भले मोठे असल्याने ते कापण्यासाठी त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग व झाड कापण्यासाठी यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान घटनास्थळी पोचलेल्या आमदार डिलायला लोबो यांना याबाबत जवानांनी माहिती दिली.
तज्ञ कर्मचाऱयांची कमतरतता
आमदार डिलायला लोबो यांनी अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांना बोलावून घेतले तसेच उपअधिकारी अशोक परब व फायर फायटर प्रवीण पिसुर्लेकर घटनास्थळी दाखल झाले. फेर्राव यांनी आपल्या खात्याकडे झाडे कापणारे तज्ञ जवान नसल्याचे सांगितल्यावर आमदारही भडकल्या. अखेर त्यांनी आपल्या गावातील झाडे कापणारे कामगार बोलावून घेतले. यावेळी घटनास्थळी आलेल्या मार्ना पंचायतीच्या सरपंच शर्मिला वेर्णेकर, पंच विलियम डिसौझाही यांनीही नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी सेवेकडे लक्ष घालावे : डिलायला लोबो
अग्निशामक दलाकडे झाडे कापणाऱया तज्ञ वर्गाची सोय असलेले पाहिजे. शिवोली पोरबावाडा येथे भले मोठे आंब्याचे झाड मुळासकट पडलेले, मात्र अग्निशामक दलाकडे कर्मचारी वर्ग व झाडे कापणारे तज्ञ नाहीत ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. आपत्कालीन वेळी झाडे कापणारे तज्ञ व यंत्रणा पुरवावी अशी मागणी आमदार डिलायला लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली.
अग्निशामक दलास ग्रामस्थांनी धरले धारेवर
अंतर्गत रस्त्याच्या मधोमध आंब्याचे झाड पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी सुमारे चार तास बंद होता. यामुळे स्थानिक नागरिकांचे बरेच हाल झाले. झाड कापण्यास अग्निशामक दलाचे जवान तयार नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिक व सरपंच शर्मिला वेर्णेकर यांनी दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव व इतरांना बरेच धारेवर धरले. हत्याराविना येथे का आलात असा प्रश्न उपस्थित केला असता बॉस्को फेर्राव यांनी आपल्याकडे झाडे कापणारे कर्मचारी व तज्ञ नसल्याचे सांगितले. यावेळी काहीवेळ ग्रामस्थ व अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांमध्ये बाचाबाची झाली.
वीज खात्याचे कर्मचारी वर्ग सायं. 7 वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी आले. रात्री उशिरापर्यंत आंब्याचे झाड कापण्याचे व वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.









