कामकाजासाठी मिळणार मोबाइल-लॅपटॉप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारचे अधिकारी आता हायटेक होणार आहेत. 1.13 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीचे मोबाइल, लॅपटाप अन् उपकरणे या अधिकाऱ्यांना सरकारकडून पुरविण्यात येणार आहेत. तसेच ही उपकरणे चार वर्षांनंतर वैयक्तिक वापरासाठी या अधिकाऱ्यांना स्वत:कडे बाळगता येणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने याविषयी एका पत्रकाद्वारे दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार पात्र अधिकारी स्वत:च्या अधिकृत कामकाजासाठी 1.13 लाख रुपयांद्वारे मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट, नोटबुक, अल्ट्राबुक, नेटबुक किंवा अन्य उपकरणे खरेदी करू शकतात.
केंद्र सरकारचे उपसचिव आणि त्याहून अधिक वरिष्ठ पातळीचे सर्व अधिकारी अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी पात्र असणार आहेत. ही उपकरणे एक लाख रुपयांपर्यंतची असू शकतात. परंतु ज्या उपकरणांच्या निर्मितीत 40 टक्क्यांहून अधिक सुटेभाग मेक-इन-इंडिया असतील, त्यांच्यासंबंधी खर्चाची मर्यादा 1.30 लाख रुपये असणार आहे.
एखाद्या मंत्रालयात किंवा विभागात अधिकाऱ्याला पूर्वीपासून उपकरण पुरविण्यात आले असल्यास त्याला 4 वर्षांपर्यंत नवे उपकरण जारी केले जाऊ शकत नाही. परंतु उपकरणे दुरुस्तीयोग्य न राहिल्यास हा नियम अपवाद ठरणार असल्याचे आदेशात म्हटले गेले आहे.
उपकरण अधिकाऱ्याला सोपविण्यापूर्वी यातील पूर्ण डाटा हटविण्यात आला असावा याची खबरदारी संबधित मंत्रालय किंवा विभागाने घ्यावी असे पत्रकात नमूद आहे. यापूर्वी 27 मार्च 2020 च्या आदेशानुसार अशा उपकरणांसाठी 80 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली होते. तसेच या उपकरणांचा वैयक्तिक कारणासाठी वापर करण्यास मनाई होती.









