निर्देशांक तीन वर्षांमधील सर्वात कमी पातळीवर
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
घाऊक महागाई दरात मोठी घट झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ही घट दिसून आली. आता हा दर गेल्या तीन वर्षांमधील सर्वात कमी पातळीवर पोहचला आहे. मे महिन्यात हा दर -3.48 टक्के इतका राहिला. सर्वच क्षेत्रांमध्ये मे 2022 च्या तुलनेत किमती कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात महागाई निर्देशांकाने 16.6 टक्के इतकी अधिक पातळी गाठली होती.
विशेषत: इंधनाच्या महागाई दरात घट दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर इंधनावरील कर कमी करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून या मे महिन्यात इंधन महागाई दरात -9.2 टक्के अंतर राहिले आहे. तर उत्पादित वस्तू महागाई निर्देशांक 3 टक्क्यांनी कमी झाला आहे. प्रमुख वस्तू महागाई दरात 1.8 टक्के तर अन्नमहागाई निर्देशांक 1.6 टक्के कमी झाला आहे.
तीन वर्षात प्रथमच
मे 2023 मध्ये घाऊक महागाई निर्देशांक -3.48 टक्के आहे. खनिज तेले, पायाभूत धातू, अन्न उत्पादने, वस्त्रप्रावरणे, बिगर अन्न वस्तू, कच्चे इंधन तेल, नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आदी वस्तूंच्या दरात घट झाल्याने महागाई निर्देशांक कमी झाला आहे. वीज महागाई निर्देशांकही नकारात्मक पातळीवर पोहचला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दरातही घट झाली होती. त्याच पावलावर पाऊल टाकून आता घाऊक महागाई दर निर्देशांकही मोठ्या प्रमाणात घसरला आहे, अशी माहिती सांख्यिकी विभागाने दिली.
उपायांचे परिणाम
गेल्यावर्षी महागाईने कळस गाठला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपायांची घोषणा केली होती. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात सातत्याने वाढ करण्याचे धोरण आचरणात आणले होते. त्यामुळे वित्त बाजारात रोख रकमेच्या प्रमाणात घट होऊन महागाईवर नियंत्रण आणले गेले होते. आता या उपायांचे परिणाम दिसून येत आहे. हाच कल पुढेही राहिला, तर महागाई आणखी कमी होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.









