वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीत दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी एका मोहिमेनंतर अटक केली आहे. जर्मनीत धोकादायक जैविक अस्त्रांनी हल्ला करण्याचा कट त्या दहशतवाद्यांनी रचला होता. इराणचे नागरिक असलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना पोलिसांनी नॉर्थ रहाइन वेस्टफेलिया या भागातून अटक केली आहे. जर्मनीत या दहशतवाद्यांना एमजे आणि जेजे असे संबोधिण्यात येत आहे.
दोन्ही आरोपींच्या घरातून सायनाइड आणि रायसिन यासारखी अनेक विषारी रसायने जप्त करण्यात आली आहेत. धोकादायक रसायनांचा वापर करत हे दहशतवादी अनेक लोकांचा जीव घेऊ पाहत होते. रायसिन या रसायनाने एखाद्याच्या शरीरात प्रवेश केल्यास काही क्षणात त्याचा जीव जाऊ शकतो. रायसिन हे सायनाइडपेक्षा 6 हजार पट अधिक धोकादायक असते.

एफबीआयकडून मिळाले इनपूट
जर्मनीच्या सुरक्षा दलांना अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयकडून संभाव्य रसायन हल्ल्याची माहिती मिळाली होती. सोशल मीडिया ऍप टेलिग्रामवरील एका चॅटमुळे या कटाचा उलगडा झाला होता. या चॅटिंगमध्ये दोन्ही दहशतवादी बॉम्ब निर्मिती आणि अनेक प्रकारच्या जीवघेण्या रसायनांबद्दल संभाषण करत होते.
दहशतवादी कटाची माहिती मिळताच जर्मनीच्या सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करत दोघांना अटक केली आहे. कारवाईपूर्वी परिसरातील लोकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्यावर आमचे सुरक्षा दल वेगाने कारवाई करते. दोन्ही दहशतवाद्यांना हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जर्मनीत अशाप्रकारच्या आरोपांकरता 3-15 वर्षांची शिक्षा होत असल्याचे गृहमंत्री नॅन्सी फेजर यांनी सांगितले आहे.
जर्मनीत 2018 साली टय़ुनिशियाच्या एका दांपत्याला रसायनांचा वापर करत हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक झाली होती. हे दांपत्य इस्लामिक स्टेटचे समर्थक होते. याप्रकरणी पतीला 10 वर्षांची तर पत्नीला 8 वर्षांची शिक्षा झाली होती.









