वृत्तसंस्था /लाहोर
विश्वचषकाला काही दिवस शिल्लक राहिले असतानाच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे आगामी वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आशिया चषक स्पर्धेत नसीम शाहच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून ही दुखापत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नसीम शाह सध्या दुबईत उपचार घेत आहे. तेथे त्याचे स्कॅन केले जातील. नसीमच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर नसीम मैदानाबाहेर गेला. दुखापत गंभीर असल्याचे समजताच नसीम आशिया चषकातून बाहेर पडला आहे. दुबईत सध्या त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. आणखी काही चाचण्या करण्यात येणार असून यानंतरच तो वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार की नाही, हे समजणार आहे. आगामी वर्ल्डकप पाहता पीसीबीने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असून वर्ल्डकपपूर्वी तो बरा होईल, असा विश्वास पीसीबीने व्यक्त केला आहे.









