18 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर जाहीर केली निवृत्ती
वृत्तसंस्था /लंडन
इंग्लंड अनुभवी वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 34 वर्षीय स्टीव्हन फिनने 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आणि आता निवृत्तीची घोषणा केली. सततच्या दुखापतीमुळे त्रस्त झालेल्या फिनने सोमवारी हा अचानक निर्णय घेतला. स्टीव्हन फिनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. फिनच्या नावावर तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 254 विकेट्स आहेत. ‘क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आज मी तत्काळ निवृत्ती घेत आहे. मागील 12 महिन्यांपासून मी माझ्या शरीराशी लढा देत आहे आणि पराभव स्वीकारला आहे’, असे निवृत्तीची घोषणा करताना फिनने सांगितले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फिन मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नव्हता. दरम्यानच्या काळात त्याने दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न केले. पण पुन्हा मैदानात पूर्वीप्रमाणे खेळण्याची शक्यता नाही, म्हणूनच निवृत्ती स्वीकारली असल्याचे त्याने सांगितले.
फिनची कामगिरी
इंग्लंडकडून खेळताना त्याने 36 कसोटी, 69 वनडे आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने अनुक्रमे 125, 102 आणि 27 विकेट्स घेतल्या आहेत. फिनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 12 मार्च 2010 रोजी केले होते. बांगलादेशविरुद्ध त्याने पहिला सामना खेळला होता. यानंतर 30 जानेवारी 2011 मध्ये त्याने पहिला वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. टी-20 क्रिकेटमध्येही फिनने 2011 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण केले होते. इंग्लंडसह फिनने मिडलसेक्स आणि ससेक्स या कौंटी संघांसाठीही दीर्घकाळ क्रिकेट खेळले. फिनने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, फिन 2010, 2011 आणि 2015 अॅशेस मालिका जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा भाग होता. 2015 च्या अॅशेस मालिकेत तो इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. त्याने 12 विकेट घेतल्या होत्या.









