253 राजकीय पक्षांना केले निष्क्रीय : 86 पक्षांना यादीतून वगळले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने नियमांचे पालन न करणाऱया सुमारे 253 छोटय़ा राजकीय पक्षांना निष्क्रीय केले आहे. या निष्क्रीय करण्यात आलेल्या पक्षांपैकी काही पक्ष अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढवत होते. बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या अहवालाच्या आधारावर या राजकीय पक्षांना निष्क्रीय करण्यात आले आहे. तसेच 86 राजकीय पक्षांचे नाव निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या यादीतून हटविले आहे.
निवडणूक चिन्ह मिळाल्यावर सक्रीय नसलेल्या राजकीय पक्षांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोग दीर्घकाळापासून जमवत होता. यासंबंधी निवडणूक आयोगाने बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडून विस्तृत अहवाल प्राप्त केला आहे. 253 पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. छोटय़ा राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर दिले नव्हते असे सांगण्यात आले.
निवडणूक लढविण्याची अनुमती आयोगाकडून मिळाल्यावर निवडणूक चिन्हाशी निगडित अटींचे पालन करणे अनिवार्य असते. अनेक राज्यांमधील राजकीय पक्ष या अटींचे पालन करत नव्हते. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 253 पक्षांना निष्क्रीय करण्यात आले आहे.
कारवाई झालेले अनेक राजकीय पक्ष मागील अनेक निवडणुकांपासून दूरच राहिले होते. या पक्षांकडून कुठलाच उमेदवार उभा केला जात नव्हता. याचीच दखल घेत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. याचबरोबर 86 छोटय़ा पक्षांची नावे देखील निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या यादीतून वगळली आहेत.









