काम केवळ बियर पिणे
जर्मनीच्या म्युनिचमध्ये ऑक्टोबरफेस्ट पार पडला आहे. आहे. यंदा 190 वे ऑक्टोबरफेस्ट साजरा करण्यात आला आहे. या महोत्सवाला बियर फेस्टिव्हलही म्हटले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात मनोरंजना आणि सुरक्षेसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. परिसरात वैद्यकीय केंद्र, एक पोलीस विभाग आणि एक हरवले-मिळाले ब्युरो स्थापन करण्यात आला होता. 600 हून अधिक पोलीस अधिकारी आणि सुमारे 1000 पालिका कर्मचरी तसेच खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी व्यवस्थेची देखरेख केली.
ऑक्टोबरफेस्टची सुरुवात 12 ऑक्टोबर 1810 रोजी बवेरियाचे राजपुत्र आणि राजकुमारी थेरेसी वॉन यांच्या विवाहाच्या जल्लोषादाखल झाली होती. त्या काळी हा एक शाही उत्सव होता, परंतु आता हा जल्लोष जगभरात साजरा केला जाणारा बियर फेस्टिव्हल ठरला आहे. यानिमित्त लोक पारंपरिक बवेरियन पोशाख परिधान करतात आणि स्थानिक खाद्यपदार्थ तसेच बियरचा आनंद घेतात. या फेस्टिव्हलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात बियरचा आनंद घेतात. बियर पिण्यासाठी लाखो लोक एकत्र येतात, वेटरच्या हातात 5-10 बियर मग भरलेले दिसून येतात. प्रत्येक टेबलवर लोक मित्रांसोबत बियरचा आनंद घेत असतात. याचबरोबर हा फेस्ट अनेक प्रकारचे झोपाळे, गेम्स, परेड, डान्स आणि आकर्षक संगीताने युक्त असतो. येथे प्रत्येकासाठी काही ना काही खास आहे, जे या अनुभवाला स्मरणीय करते. या फेस्टिव्हलमध्ये सर्व वेगवेगळ्याप्रकारचे अनोखे कपडे परिधान करतात.
यंदा आयोजकांनी लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि अत्याधिक मद्यसेवन न करण्याचे आवाहन केले होते. जून महिन्याच्या अखेरपासून या महोत्सवाची तयारी सुरू होती. या ऑक्टोबरफेस्टमध्ये 60-70 लाख लोक सामील झाले आहेत. यातील बहुतांश जण जर्मनी खासकरू बवेरिया राज्यातून येतात, अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकही पोहोचले, ज्यात अमेरिका, इटली, ब्रिटन, ऑस्ट्रिया, पोलंड, फ्रान्स, स्वीत्झर्लंड, स्पेन, नेदरलँडचे लोक सामील होते.









