गेल्या काही दशकांपूर्वी बैठी सुबक घरे ठिकठिकाणी आढळत. मागेपुढे अंगण, तुळशी वृंदावन आणि परसदारी छोटीशी बाग हे घराचे वैभव होते. देवाच्या पूजेसाठी लागणारी झाडे, फुले, फळे बागेत असायची. आंबा, कडुनिंब, बेल ही झाडे, जास्वंद, पारिजातक, जाई-जुई फुले, केळ, डाळिंब, लिंबू, पेरू ही फळे, विड्याच्या पानांचा वेल आणि आवर्जून लावलेले, जोपासना केलेले कापसाचे झाड. कोणतीही पूजा असो देवाला देवकापसाचे वस्त्र हवेच. हळदकुंकवाची बोटे लावलेली कापसाची माळ देवाला वाहिल्याशिवाय पूजेला पूर्णता येत नाही. त्याला सूतपुतळी वस्त्र असेही म्हणतात. ज्याप्रमाणे नारळाच्या झाडाचा सर्व प्रकारे उपयोग होतो त्याप्रमाणे कापसाच्या झाडाचे सर्व भाग उपयोगाला येतात. कापसातली सरकी हा जनावरांचा पौष्टिक आहार आहे, त्यामुळे दुभती जनावरे जास्त दूध देतात. कापसाचे पान, मुळे, फुले कातडीचे रोग बरे करतात. त्यामुळे कातडी मऊ होते. परसदारी असलेल्या कापसाची वस्त्रs करून देवाला वाहण्यात असलेला आनंद काही औरच! पांढराशुभ्र, मऊ कापूस हे देवाघरचे अनमोल देणे आहे.
‘ससा ससा दिसतो कसा? कापूस पिंजून ठेवलाय जसा’ हे बालगीत कापसाचा कोमल मऊपणा डोळ्यांसमोर आणते. आकाशातले ढग कापसाच्या राशींसारखे दिसतात. असे ढग मनामध्ये गूढता निर्माण करतात. कापसासारख्या ढगांमधून कुणीतरी देवदूत येईल आणि आपल्या अस्तित्वाची आपल्यालाच ओळख करून देईल अशी ओढ लागते. थंडीच्या दिवसात जेव्हा हे कापूसढग धुके बनून धरतीवर येतात तेव्हा ते लपेटून घ्यावेसे वाटतात. सुखदु:खाच्या पलीकडे आनंदराशीकडे नेणारी परमात्म्याचे आपल्याकडे धाडून दिलेले ते दूतच वाटतात. तुलसीरामायणामध्ये संत तुलसीदासांनी प्रथम सर्वांना वंदन केले आहे. त्यात संतसमूहाला, साधूंना वंदन करताना ते म्हणतात,
‘साधु चरित सुभ सरिस कपासू ।
निरस बिसद गुनमय फल जासू ।
जो सहि दुख परछिद्र दुरावा ।
बंदनीय जेहि जग जस पावा?’
-संत तुलसीदास गोस्वामी म्हणतात, साधूसंतांचे चरित्र हे कापसाच्या फुलासारखे आहे. यावर श्रोत्यांनी त्यांना असे विचारले की गुलाबासारखी सुंदर रंगाची फुले असताना संतांना कापसाच्या फुलाची उपमा कां बरे दिली? यावर गोस्वामी तुलसीदासांनी सुंदर उत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘गुलाबाच्या फुलांना विशिष्ट आकार असतो. विविध रंग लेऊन ती प्रकटतात. शिवाय त्यात गंध आणि रस देखील असतो. साधूसंत हे कापसाच्या फुलासारखे असतात. त्यांचे जीवन त्या फुलांसारखे शुभ्र असते. ज्याप्रमाणे कापसाच्या फुलांमध्ये रस-रूप-गंध नाही त्याप्रमाणे संतांचे जीवन हे निरपेक्ष असते. आशा आणि तृष्णेचा त्यांनी त्याग केला असतो. संतांचे जीवन विशुद्ध असते. कापसाचे फूल हे अनेक तंतूंचे बनलेले असते. साधूंचे जीवन म्हणजे सद्गुण आणि सदवृत्ती यांचा संग्रह आहे. कापसाचे फूल निवडावे लागते. ते कापसापासून वेगळे काढतात आणि पिंजायला देतात. पिंजून त्याचे कापड बनवतात. जेव्हा कापसापासून कापड तयार होते तेव्हा ते लज्जारक्षण करते. साधूंचे जीवन म्हणजे समर्पण आहे. त्यांचे समर्पण प्रपंचाला झाकून टाकते. प्रपंचात माणूस सदैव उघडा पडतो. षड्रिपूंच्या आहारी जातो तेव्हा त्याचे रक्षण संत करतात. संत तुलसीदास म्हणतात, संतांचा समाज हा संसारातील छिद्रे झाकून टाकणारा समाज आहे. कापसाचा मुख्य गुण कोणता? तर तो आपले मूळ स्वरूप बदलून वस्त्र बनतो. लोकांचे लज्जारक्षण करतो. देह झाकतो. तसे साधूसंत आपल्या गुणांनी लोकांचे दोष झाकतात.
कापसापासून जे वस्त्र तयार होते त्या वस्त्राला संत ज्ञानेश्वर माऊली कापसाचा नातू असे म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी कापसाचे पुष्कळ दृष्टांत दिले आहेत. ‘पाहे पा कापसाच्या पोटी । काय कापडाची होती पेटी?। तो वेढितयाचिया दिठी। कापड जाहला?’ कापसामध्ये कापड आहे का? कापसापासून कापड बनवले की कापूस कापडासारखा होतो. शस्त्रक्रिया असो वा जखम, ती मऊ कापसाच्या स्पर्शाने हलकी, सहन करण्याजोगी होते. कापूस वेदना कमी करतो. कापूस आणि अग्नी हे दोघे परस्परविरोधी आहेत. माऊलींनी एक सुरेख दृष्टांत दिला आहे. ‘देखै अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळू होये । तै ते कापुसे गिवसूंये । जिया परी?’ याचा अर्थ असा की अग्नी हातात घेतला तर तो हात जाळणारच. परंतु अग्नी विझला की त्याची राख होते, ती तुम्ही कापसामध्ये घेऊ शकता. या ओवीचे मर्म ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त बाबा बेलसरे यांनी उलगडून सांगितले आहे. ते म्हणतात, माणसाचे कर्म हे अग्नीसारखे आहे. ते समाधानाला जाळणारे, मनाला अस्वस्थ करणारे आहे. ते मनाला चैन पडू देत नाही. कर्माला जर विशिष्ट वळण दिले तर त्याची विझून गेलेल्या अग्नीसारखी राख होईल. मग ते तुम्ही कापसात घेऊ शकता. कर्म करून तुम्ही अलिप्त राहू शकता. माऊली म्हणतात, तुम्ही जर सतत सोबती असणारा ‘मी’पणा विसरून गेलात तर अग्नी जसा कापसात राख म्हणून घेता येतो तसा संसारही राख म्हणून सहज अनासक्तपणे हातात घेता येईल.
कापसापासून जे कापड तयार होते त्याला सुती वस्त्र असे म्हणतात. उन्हाळ्यासारख्या ऋतुमध्ये सुती वस्त्राला पर्याय नाही. सुती वस्त्र हे माणसाच्या कातडीला पूरक आहे. परमात्म्याचे जे अनेक अवतार आहेत त्यात अंबर अवतार आहे. तो श्रीकृष्णाने द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी घेतला आहे. दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्र फाडले तेव्हा तिला अगणित साड्या भगवंताने पुरवल्या असेच वर्णन ऐकण्यात व वाचण्यात येते. परंतु श्रीमद् भागवत आणि महाभारतात तसा उल्लेख नाही. उलट असे म्हटले आहे की परमात्मा हाच द्रौपदीची साडी झाला. कापसाच्या कापडाचा वस्त्रावतार प्रत्यक्ष परमात्म्याने घेतला आहे.
धरित्रीकन्या बहिणाबाई चौधरी यांची एक आठवण त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरींनी सांगितली आहे. ते म्हणतात, ‘कापूसवेचणीच्या वेळी मी एकदा आईबरोबर शेतात गेलो होतो. कापसाचे बोंड हाती घेतले व त्याचा कापूस बाजूला काढून सरकी हातावर घेतली. त्यावर आई म्हणाली, पहा. देवाने सरकीला कसा पांढरा स्वच्छ पोशाख नेसून पाठवलं. पण माणसाने तिला नागडी केली आणि तिचे वस्त्र तो आपण स्वत:च नेसू लागला.’ किती वेगळा विचार! कापसाची बोंडं उकलू लागली की सारे शेत कसे पांढरेशुभ्र, सुंदर दिसते. देवाने माणसाला दिलेली ही सुंदर भेट आहे. त्याचा मान राखून कापसासारखे मऊ, कोमल आणि वेदनेवर फुंकर घालणारे माणसाचे अंत:करण असावे अशी परमेश्वराची इच्छा असेल. माणसाने त्यावर विचार करायलाच हवा.
-स्नेहा शिनखेडे








