सेन्सेक्सची 551 अंकांवर पडझड : निफ्टीही प्रभावीत
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र राहिले आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये नकारात्मक स्थिती ही मध्यपूर्व संघर्षामुळे निर्माण झाली आहे, तर अमेरिकन व्याजदर वाढीच्या काळजीमुळेही बाजारात चिंता राहिल्याचे दिसून आले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर तब्बल 551.07 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 65,877.02 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 140.40 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 19,671.10 वर बंद झाला आहे. याच दरम्यान एमएमटीसी 10 टक्क्यांनी आणि बजाज फायनान्समध्ये 3 टक्क्यांनी घसरण राहिली आहे.
या क्षेत्रांची स्थिती
बुधवारच्या सत्रात बीएसई व एनएसई यांच्या कामगिरीमध्ये निफ्टीमधील वाहन आणि औषध यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत.
या घटनांचाही प्रभाव
भारतीय बाजारावर चीनमधील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे धातू क्षेत्रात तेजीचा कल राहिला. तर मध्यपूर्व संघर्ष आणि अमेरिकी फेडरलच्या दरासंबंधी चिंतेंच्या कारणास्तव भारतीय बाजार नुकसानीत राहिला आहे. याच दरम्यान निफ्टीत मिडकॅप, स्मॉलकॅप, आयटी, बँक, एफएमसीजी, फायनान्स आदींमध्ये घसरणीची नोंद करण्यात आली आहे.
तिसऱ्या सत्रात सेन्सेक्समधील 26 समभाग हे प्रभावीत झाले आहेत. यात सर्वाधिक नुकसानीत बजाज फायनान्स राहिला असून हा 2.85 टक्क्यांनी नुकसानीत राहिला. तर बजाज फिनसर्व्ह 2.02 टक्के, अॅक्सिस बँक 1.43 टक्क्यांनी प्रभावीत झाले. दुसरीकडे टाटा मोर्ट्स 1.85, सनफार्मा 1.46 टक्के आणि मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्या समभागात काहीशी वाढ झाली आहे.
जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजारात घसरण अनुभवायला मिळाली. डोव्ह जोन्स 122 अंकांनी तर नॅसडॅक 90 अकांनी नुकसानीत होता. आशियातील बाजारात मात्र मिश्र कल होता. निक्की तेजीत होता.









