कोल्हापूर / संग्राम काटकर :
कसबा बावडा, लाईन बाजारातील हे आहेत नारायण जयसिंग पाटील. बास्केटबॉल हे आपले पॅशन समजून त्यात करिअर करत आहेत. कसबा बावडा पॅव्हेलियन स्टेडियममधील बास्केटबॉल मैदानात प्रशिक्षण देण्याचे काम करताहेत. त्यातही गेल्या दोन वर्षांपासून ते 45 मुला-मुलींना बास्केटबॉलचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षण घेणारी ही सर्व मुले-मुली झोपडपट्टीतील आहेत. त्यांना मायेने जवळ घेऊन नारायण हे त्यांच्या बास्केटबॉल भिनवत आहे. स्पर्धा खेळण्या लायक त्यांना बनवत आहेत. रोजच्या सरावातून मुले-मुलीही चांगले बास्केटबॉल खेळताहेत. त्यांचे दोन संघ तयार कऊन ते विविध स्पर्धांमध्ये दाखलही केले आहेत.
नारायण पाटील याचा बास्केटबॉल खेळाडू ते प्रशिक्षक असा प्रवास फार मोठा आहे. साई हायस्कूलमध्ये शिकत असताना शालेय बास्केटबॉल स्पर्धा खेळल्या. विवेकानंद कॉलेजातही शिकत असतानाही त्यांनी कॉलेजच्या संघाचे कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्यांनी कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघातूनही फेडरेशनच्या दोन राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या संघातही स्थान मिळवत पश्चिम विभागीय अंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेबरोबरच अश्वमेधमधील स्पर्धेतही प्रतिनिधित्व केले. उत्कृष्ट शूटर अशी त्यांनी बास्केटबॉलमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्याकडील बास्केटबॉलची गुणवत्ता पाहून माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा पॅव्हेलियन स्टेडियममधील बास्केटबॉल मैदानात प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्याची ऑफर दिली. त्यांनीही खुल्या मनाने ऑफर स्वीकारून प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यास समर्थता दर्शवली.
2022 साली महापालिकेने ऋतुराज पाटील यांनी दिलेल्या फंडातून बनवलेल्या बास्केटबॉल मैदानात ते 2023 पासून बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून सक्रिय झाले. याच काळात त्यांनी अधिकृतपणे बावडा वॉरियर्स अॅकॅडमीची स्थापना केली. प्रशिक्षण देण्यासाठी चार बॅच बनवल्या. त्यापैकी एका बॅचमधील मुलांकडून प्रशिक्षणाच्या मोबदल्यात शुल्क घेतानाच अन्य तीन बॅचमधील मुलांकडून पैसे न देण्याचे त्यांनी ठरवले. त्याचही सामाजिक भान म्हणून सतेज क्लस्टर या नावाने एक बॅच सुरु केली. यामध्ये जाणीवपूर्वक बास्केटबॉलपासून अनभिज्ञ झोपडपट्टीतील मुलांना बॅचमध्ये घेणे सुरू केले. कसबा बावड्यातील भगतसिंग वसाहत या नावाने असलेल्या झोपडपट्टीतील कुटुंबियांनीही मुल-मुलींना बास्केटबॉल खेळण्यासाठी नारायण यांच्याकडे पाठवले. 2023 सालच्या पहिल्याच बॅचमध्ये सहभागी झालेल्या 22 मुलं-मुलींना बास्केटबॉलमधील ड्रिबलिंग, शूटिंग, पासिंग, अटॅक-काऊटर अटॅक, डिफेन्सिंग ऑफेन्सिव्ह स्टटर्जीस् व डिसिप्लिन याचे रोजच्या रोज प्रशिक्षण दिले. बास्केटबॉल सामना खेळण्यासाठी लागणारी क्षमता वाढेल अशा पद्धतीचा वर्कआऊटही ते सर्वांकडून कऊन घेत आहे.
नारायण यांची प्रशिक्षण देण्यामागची तळमळ पाहून झोपडपट्टीतील आणखी मुले-मुली त्यांच्याकडे आली. गेल्या दीड वर्षांपासून तर ते 45 मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्यांना इंग्रजी समजावे म्हणून इंग्रजी पेपरमधील संशोधन, विज्ञानाशी संबंधित बातमी, लेख त्यांच्याकडून वाचून घेतात. बास्केटबॉल प्रशिक्षणासाठी बॉलपासून सरावासाठी जे साहित्य आवश्यक ते स्वखर्चातून मैदानात आणतात. सरावावेळी खेळाडूला इजा झाल्यास प्राथमिक उपचारही तेच करतात. नारायण यांनी 2023 पुर्वी श्रीमंत माईसाहेब बावडेकर हायस्कूल, अॅग्रीकल्चर कॉलेज ऑफ कोल्हापूरच्या संघांना प्रशिक्षण दिले आहे. बास्केटबॉलचा अधिकृत प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यासाठी बेंगळरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्मधून एनआयएस सर्टिफिकेशन कोर्स केला आहे. 2016 साली बास्केटबॉल बी-पॅनल रेफ्री परीक्षा देऊन त्यात यश मिळवले. सध्या ते देशातील नामवंत टेनवीक स्पोर्टस् या कंपनीच्या माध्यमातून हेडकोच म्हणून निपाणीमधील एका शाळेत प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.
कसबा बावड्यात बास्केटबॉल कल्चर तयार करायचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मुला-मुलींना बास्केटबॉल प्रशिक्षणाकडे वळवणे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. झोपडपट्टीतील मुलां-मुलींना तर कोल्हापूरी क्रीडा परंपरचा भाग बनवून बास्केटबॉलमध्ये करिअर करण्यास उद्युक्त करणे हे ही दुसरे लक्ष्य आहेच. आपल्या या वाटचालीला डॉ. शरद बनसोडे डॉ. राजेंद्र रायकर, गजानन बेडेकर, सरकार पाटील, राजू कवाळे, शिवम लाड व सचिन चौगले यांचे सहकार्य मिळत आहे.
नारायण पाटील (बास्केटबॉल प्रशिक्षक)
राजर्षी शाहू विद्यामंदिरात शिक्षण घेत मी नारायण पाटील यांच्याकडे बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळेच मी निपाणी येथे आयोजित केलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळू शकलो. कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनने तर माझ्या खेळाची दखल घेऊन मला महाराष्ट्र 13 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघ निवड चाचणीसाठी पाठवले होते.
समर्थ चौगुले (बास्केटबॉल खेळाडू)








