ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील घराबाहेर सोने-चांदी आणि पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. या बॅगेत देव-देवतांच्याही मूर्ती आहेत. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती लाड यांच्या घराबाहेर ही बॅग ठेवून गेल्याचे लाड यांच्या सुरक्षारक्षकाने सांगितले.
प्रसाद लाड हे भाजपचे विधानपरिषदेवरील नवनिर्वाचित आमदार आहेत. मुंबईतील माटुंगा परिसरात लाड यांचं घर आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती लाड यांच्या घराबाहेर बॅग सोडून गेला. लाड यांच्या सुरक्षारक्षकाने फोनवरुन लाड यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर लाड यांनी तात्काळ माटुंगा पोलिसांना कळवले. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज सापडला. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली. मात्र, अज्ञात व्यक्तीने लाड यांच्या घराबाहेर सोने-चांदी आणि पैशाने भरलेली बॅग का ठेवली, हा प्रश्न कायम आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
हेही वाचा : राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे; मुख्यमंत्री शिंदेंचं विठूरायाला साकडं
लाड यांना मागील आठवडय़ातच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सीडीआर रिपोर्ट काढून मला धमकी देणाऱ्याचा शोध घ्या, असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. दरम्यान, आज अज्ञात व्यक्ती अशा प्रकारे घराबाहेर बॅग ठेवून गेल्याने लाड कुटुंबीय धास्तावले आहेत.