धर्मवीर संभाजी चौक परिसरातील घटना
बेळगाव : धर्मवीर संभाजी चौक परिसरात उभ्या केलेल्या कारच्या पाठीमागची काच फोडून चोरट्यांनी सुमारे 50 हजार रुपयाहून अधिक रोकड असलेली बॅग पळविल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती समजताच कॅम्प पोलिसांनी धर्मवीर संभाजी चौक परिसरात येऊन पाहणी केली. रात्री कॅम्प पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरातील सीसीटीव्हीत चोरट्यांची छबी शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. एक कंत्राटदार धर्मवीर संभाजी चौक परिसरात आपली कार उभी करून बाजारात गेला होता. बाजारातून ते परतले त्यावेळी कारच्या पाठीमागची काच फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरे तर या परिसरात वाहने उभी करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पे पार्किंग असूनही गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे.









